राहुल गांधींनीच अध्यक्ष व्हावं, त्यांनी सांगितलं तर महाराष्ट्रातील सत्तेतून बाहेरही पडू; राज्यातील काँग्रेस नेत्याची 'मन की बात'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 02:22 PM2020-08-24T14:22:04+5:302020-08-24T15:19:00+5:30
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे पुन्हा काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात यावे अशी मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांकडून करण्यात येत आहे.
नवी दिल्ली: काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधींनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधींनी अंतरिम अध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा सांभाळली. मात्र त्यांचा वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे काँग्रेसची सूत्रं नेमकी कोणाकडे जाणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे पुन्हा काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात यावे अशी मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांकडून करण्यात येत आहे. तर काहींनी आडमार्गाने विरोध दर्शवला आहे. मात्र महाराष्ट्राचे पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधींनी पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारावं, असं मत व्यक्त केलं आहे.
'टीव्ही ९' या वृत्तवाहिनीशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, सोनिया गांधींनी पक्षाला उभारी दिली. काँग्रेस पक्षात खऱ्या अर्थानं लोकशाही असून गांधी कुटुंबानंच पक्षाचं नेतृत्व करावं. तसेच गांधी परिवाराकडे पक्ष आणि देश सांभाळण्याची क्षमता असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे राहुल गांधींच्या इच्छेनुसारच काँग्रेस महाविकास आघाडीत सहभागी राहुल गांधींनी निर्णय घेतला की सरकारमधून बाहेर पडावं तर बाहेर पडू, असं मोठं विधानही विजय वडेट्टीवर यांनी केलं आहे. विजय वडेट्टीवार यांच्या या विधानामुळे आता वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या देशभरातल्या २३ महत्त्वाच्या नेत्यांनी अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिलं. पक्षाला पूर्णवेळ आणि प्रभावी अध्यक्ष हवा, अशी मागणी या नेत्यांनी पत्रात केली. एका बाजूला २३ नेते पूर्णवेळ आणि प्रभावी अध्यक्ष द्या, अशी मागणी करत असताना दुसऱ्या बाजूला अनेक मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेत्यांनी सोनिया आणि राहुल गांधींच्या नेतृत्त्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. मात्र राहुल गांधी पक्षाध्यक्षपद स्वीकारण्यास तयार नसल्याचं वृत्त 'इंडिया टुडे'नं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.
Congress leaders including Manmohan Singh, Priyanka Gandhi Vadra, Capt. Amarinder Singh begin joining the Congress Working Committee's virtual meeting pic.twitter.com/Ql6joIWTnT
— ANI (@ANI) August 24, 2020
आपण अध्यक्षपद स्वीकारण्यास उत्सुक नाही. त्याऐवजी गांधी कुटुंबाबाहेरील एखाद्या व्यक्तीकडे अध्यक्षपद सोपवण्यात यावं, असं राहुल गांधी यांचं मत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांचा कार्यकाळ संपल्यानं त्यांच्याऐवजी डॉ. मनमोहन सिंग किंवा ए. के. अँटनी यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवण्यात येईल. त्यांच्याकडे सोनिया गांधी यांच्याप्रमाणेच अंतरिम अध्यक्षपद दिलं जाईल. कोरोना संकट संपल्यानंतर पक्षाचं अधिवेशन होईल आणि राहुल गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्षपद दिलं जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.