काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; “पक्षातून काढलं तरीही चालेल पण आता...”

By प्रविण मरगळे | Published: November 17, 2020 06:31 PM2020-11-17T18:31:58+5:302020-11-17T18:33:22+5:30

Bihar Result, Congress Sonia gandhi, Rahul gandhi News: आता काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेते पक्षाच्या नेतृत्वाविरोधात बंडखोरी करण्याचे संकेत देत आहेत

congress Leaders have rebelled again Sonia & Rahul gandhi after the defeat in Bihar elections | काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; “पक्षातून काढलं तरीही चालेल पण आता...”

काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; “पक्षातून काढलं तरीही चालेल पण आता...”

googlenewsNext
ठळक मुद्देकपिल सिब्बल यांनी काँग्रेसमध्ये विचारमंथन होणं गरजेचे आहे असं म्हटलं होतंआम्ही पक्षाला संपताना पाहू शकत नाही. यावेळी आम्ही पाऊलं मागे घेणार नाहीपक्षाकडून हकालपट्टी करायची असेल तर करावी, पण आता आम्ही गप्प बसणार नाही

नवी दिल्ली – देशात सर्वात जुना पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेसमध्ये सध्या नेतृत्वावरुन अंतर्गह कलह निर्माण होण्याची चिन्हे आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खराब कामगिरीनंतर पुन्हा एकदा गांधी कुटुंबाच्या नेतृत्वावर काँग्रेसमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेससाठी सतत पराभव होणं ही सर्वसामान्य घटना बनलीय अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी नाराजी व्यक्त केली होती.

आता काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेते पक्षाच्या नेतृत्वाविरोधात बंडखोरी करण्याचे संकेत देत आहेत, याबाबत एबीपी न्यूजने बातमी दिली आहे. कपिल सिब्बल यांनी काँग्रेसमध्ये विचारमंथन होणं गरजेचे आहे असं म्हटलं होतं. आता पक्षाच्या आणखी एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की, आम्ही पक्षाला संपताना पाहू शकत नाही. यावेळी आम्ही पाऊलं मागे घेणार नाही. पक्ष कोणा एकाचा नाही. तर दुसऱ्या नेत्याने सांगितले मला आता कोणत्याही पदाची लालसा नाही. माझ्याकडून सगळी पदं घेऊन टाका पण पक्ष आता असा चालणार नाही.

तसेच पक्षाकडून हकालपट्टी करायची असेल तर करावी, पण आता आम्ही गप्प बसणार नाही, बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीबाबत आत्मपरिक्षण करत असल्याचंही दिसून येत नाही, अखेर कधीपर्यंत हे सुरु राहणार? असा सवाल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने केला.

हे स्पष्ट आहे की, आगामी काळात कॉंग्रेसवरचं संकट आणखी वाढत जाणार आहे. याचे संकेत ज्येष्ठ नेत्यांच्या विधानावरुन दिसत आहेत. बंडखोरी राहुल गांधींच्या नेतृत्वाविषयी आहे, ज्यांना पुन्हा काँग्रेसचं अध्यक्षपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राहुल गांधी ना पूर्णवेळ अध्यक्ष आहेत ना निवडणुकीत सकारात्मक निकाल आणण्यात यशस्वी होत आहेत. मात्र, सध्या या विषयावर कॉंग्रेसचे नेतृत्व गप्प राहिले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पक्ष अशा लोकांकडे लक्ष देत नाही, म्हणून त्यांच्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही असं काही नेत्यांना वाटतं. मात्र, सध्या कपिल सिब्बल यांच्याविरूद्ध कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करण्याचा विचार नाही. असेही सूत्रांनी सांगितले. पण राजस्थानचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांनी ट्विट करुन कपिल सिब्बल यांना लक्ष्य केलं आहे. गहलोत यांनी ट्विटमध्ये गांधी परिवाराचा बचाव करत कपिल सिब्बल यांचे विधान दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे.

काही दिवसापूर्वी पक्षनेत्या सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे नेते यानिमित्ताने पुन्हा सक्रिय झाले आहेत. टीका करणाऱ्या २३ नेत्यांचा आवाज दाबण्यात आला होता. परंतु आता बिहार आणि देशाच्या इतर भागातील पोटनिवडणुकांच्या निकालानंतर या नेत्यांनी नव्याने आपला आवाज बुलंद करण्यास सुरुवात केली आहे. पक्ष खासदार कपिल सिब्बल आणि कार्ती चिदंबरम यांनी कुणाचाही नामोल्लेख न करता पक्ष नेतृत्वावर हल्लाबोल केला आहे.

बंडखोरीचा राग आळवणारे सक्रिय

एकूणच बंडखोरीचा राग आळवणारे काँग्रेस नेते पुन्हा डोके वर काढू लागले आहेत. काश्मीरमध्ये गुलाम नबी आझाद यांना बाजूला सारण्यासाठी पंचायत निवडणुकात त्यांच्या समर्थकांना नेतृत्वाच्या इशाऱ्यावरुन तिकीट नाकारण्यात येत आहे. फारुख अब्दुल्ला-मेहबुबा यांच्या आघाडीसोबत निवडणूक समझोता करू नये. कारण यामुळे जम्मूत काँग्रेसचे नुकसान होईल, असे आझाद यांचे मत होते. परंतु काँग्रेस नेतृत्वाने समझोता करण्याचा निर्णय घेऊन तुमच्या मताची पक्षाला गरज नसल्याचे संकेतच त्यांना दिले.

Web Title: congress Leaders have rebelled again Sonia & Rahul gandhi after the defeat in Bihar elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.