2024 Lok Sabha Elections: काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची शक्यता, अध्यक्ष कोण? पक्ष आखतोय रणनिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 01:59 PM2021-07-21T13:59:41+5:302021-07-21T14:00:24+5:30
Lok Sabha Elections 2024: सोनिया गांधी २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्षपदी कायम राहण्याची दाट शक्यता
Lok Sabha Elections 2024: सोनिया गांधी २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्षपदी कायम राहण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय पक्षात आता युवा काँग्रेस नेत्यांना मोठी संधी देण्याचा मानस पक्ष श्रेष्ठींचा आहे. राहुल गांधी यांची पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता फारच कमी आहे. आगामी निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्षात मोठ्या फेरबदलांची रणनिती पक्षाकडून आखली जात आहे. यात गांधी कुटुंबीयांशी एकनिष्ठ आणि युवा काँग्रेस नेत्यांना मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. (Congress is planning a major reshuffle in the party, Sonia Gandhi expected to continue as president)
एका इंग्रजी वृत्तपत्रानं काँग्रेसमधील सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार पक्षात लवकरच चार कार्यकारी अध्यक्षांची नेमणूक केली जाण्याची आशा आहे. पक्षाचे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात हे कार्यकारी अध्यक्ष सोनिया आणि राहुल गांधी यांना मदत करणार आहे. काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदासाठी गुलाम नबी आझाद, सचिन पायलट, कुमारी शैलजा, मुकुल वासनिक आणि रमेश चेन्नीथला यांची नावं आघाडीवर आहेत. दरम्यान, प्रियांका गांधी वाड्रा यांना दिल्या जाणाऱ्या नव्या भूमिकेबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सध्या प्रियांका गांधी वाड्रा यांच्यावर उत्तर प्रदेशात काँग्रेस महासचिव पदावर कार्यरत आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून सोनिया अंतरिम अध्यक्षपदी
काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारुन सोनिया गांधी यांना दोन वर्षांचा काळ लोटला आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक पक्षाकडून आजवर पुढे ढकलण्यात येत आहे. राहुल गांधी पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी आता तयार झाल्याचं देखील सांगण्यात येत होतं. पण मे २०२१ मध्ये काँग्रेसनं कोरोना परिस्थितीचं कारण देत पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा एकदा टाळली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार पक्षात पूर्णपणे नवे बदल करण्याचा राहुल गांधी यांचा मानस आहे.
२०१९ साली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीनंतर राहुल गांधी यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडलं होतं. त्यानंतर पक्षाच्या पूर्णवेळ अध्यक्षपदाच्या निवडीची मागणी काँग्रेस पक्षात केली जात आहे. राजस्थान, पंजाब, छत्तीसगड, केरळ आणि कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाला अनेक पक्षांतर्गत मुद्द्यांना सामोरं जावं लागत आहे.
पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील संघर्षामुळे तसंच राजस्थानात अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील संघर्षामुळे काँग्रेसच्या प्रतिमेला धक्का पोहोचल्याचं सांगितलं जात आहे.