"मोदी सरकार ब्लू टिकसाठी भांडतंय, कोरोना लस हवी असेल, तर आत्मनिर्भर व्हा"; राहुल गांधींचं टीकास्त्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 02:35 PM2021-06-06T14:35:29+5:302021-06-06T15:08:29+5:30

Congress Rahul Gandhi And Narendra Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 

Congress Rahul Gandhi Slams Modi Government Over Twitter | "मोदी सरकार ब्लू टिकसाठी भांडतंय, कोरोना लस हवी असेल, तर आत्मनिर्भर व्हा"; राहुल गांधींचं टीकास्त्र 

"मोदी सरकार ब्लू टिकसाठी भांडतंय, कोरोना लस हवी असेल, तर आत्मनिर्भर व्हा"; राहुल गांधींचं टीकास्त्र 

Next

नवी दिल्ली - केंद्र आणि ट्विटर यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला असून, त्याचा नवा अंक शनिवारी पाहायला मिळाला. सरकारने नोटीस बजावली असतानाच ट्विटरनेही उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक भाजप व आरएसएस नेत्यांच्या ट्विटर अकाउंटची "ब्लू टीक" काहीकाळ हटवून पुन्हा बहाल केली. ट्विटरने म्हटले की, उपराष्ट्रपतींकडून खात्यावर दीर्घ काळापासून लॉगइन केले नसल्याने ब्लू टीक हटविली होती. दोन तासांत ती पुन्हा बहाल केली.’ याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 

राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "मोदी सरकार ब्लू टिकसाठी भांडत आहे, कोरोनाची लस हवी असेल, तर आत्मनिर्भर व्हा" असं खोचक ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे. तसेच या ट्वीटसोबत Priorities हा हॅशटॅग देखील वापरला आहे. कोरोनाच्या संकटकाळात लसींचा तुटवडा असताना मोदी सरकार मात्र ट्विटरच्या ब्लू टिकला प्राधान्य देत आहे.  सोशल मीडिया कंपन्यांसाठी केलेल्या नव्या नियमांचे पालन करा, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देणारी अंतिम नोटीस केंद्र सरकारनेट्विटरला शनिवारी बजावली आहे.

केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याने जारी केलेल्या या नोटिसीत म्हटले आहे की, सोशल मीडिया कंपनीसाठी तयार केलेले नवीन नियम पाळणार की नाही, याबाबत ट्विटरने केंद्र सरकारकडे अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. या नव्या नियमांनुसार ट्विटरने केंद्र सरकारशी संपर्क साधणे आवश्यक होते. त्यामुळे हे नियम न पाळल्यास ट्विटरला कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही या नोटिसीत देण्यात आला आहे. ट्विटरसह अन्य सोशल मीडिया कंपन्यांनी सरकारने बनविलेले नवीन नियम पाळणे बंधनकारक आहे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले होते. त्यावेळी आम्ही हे नियम पाळणार आहोत व त्यासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूकही केली आहे, असे ट्विटरने न्यायालयाला सांगितले होते. मात्र, ट्विटरने केलेले दावे केंद्र सरकारने फेटाळून लावले होते.

"अबकी बार करोडो बेरोजगार, कोण जबाबदार? फक्त आणि फक्त मोदी सरकार" 

राहुल गांधी कोरोनाची देशातील स्थिती, लसीकरण, औषधं असा विविध मुद्द्यांवरून गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. बेरोजगारीवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं. केंद्र सरकारच्या "अब की बार मोदी सरकार" या घोषवाक्याची त्यांनी खिल्ली उडवली आहे. तसेच मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे. राहुल यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. "अबकी बार करोडो बेरोजगार, कोण जबाबदार? फक्त आणि फक्त मोदी सरकार" असं म्हटलं आहे. "अबकी बार करोडो बेरोजगार" हा हॅशटॅग देखील वापरला आहे. सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) कोरोना समजलाच नाही असं म्हणत याआधी त्यांनी टीकास्त्र सोडलं होतं.

Web Title: Congress Rahul Gandhi Slams Modi Government Over Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.