ममतांचा सोनियांना फोन गेला; काँग्रेसने पश्चिम बंगालमधील प्रचार थांबविला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 05:01 AM2021-04-22T05:01:25+5:302021-04-22T07:06:11+5:30
मतांचे विभाजन टाळण्यासाठी प्रयत्न; ममता बॅनर्जी यांची सोनिया गांधी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा
हरीश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण २९४ पैकी ११२ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचे ३ टप्पे अद्याप पार पडावयाचे आहेत. परंतु, नेमक्या याचवेळी काँग्रेसने येथील प्रचारातून पूर्णपणे अंग काढून घेतल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी रविवारी दूरध्वनीवरून चर्चा केल्यानंतरच काँग्रेसने या राज्यातील प्रचार जवळजवळ थांबवल्याचे दिसत आहे.
येथील मतदानाचे उर्वरित तीन टप्पे २२, २६ आणि २९ एप्रिल रोजी पार पडणार आहेत. या टप्प्यांतील मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या ४१ टक्के इतकी लक्षणीय आहे. काँग्रेससाठी हे टप्पे महत्त्वाचे आहेत कारण मालदा, मुर्शिदाबाद या परिसरात पक्ष अनेक जागांवर लढत आहे. तृणमूल काँग्रेस, काँग्रेस-डावे पक्ष यांच्यात या मुस्लीम मतांची विभागणी होऊन त्याचा लाभ भाजपला मिळू नये, असे ममता बॅनर्जी यांना वाटते. म्हणूनच त्यांनी भाजपचा पराभव आणि सेक्युलर विचारांच्या विजयासाठी काँग्रेसने आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी विनंती सोनिया गांधी यांना केल्याचे समजते.
ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर सोमवारी काँग्रेसचे पश्चिम बंगालचे प्रमुख अधिररंजन चौधरी खूप ताप भरल्याने गृह विलगीकरणात गेले आहेत. त्यांना ‘लोकमत’ला दूरध्वनीवर बुधवारी सांगितले की, आपण उर्वरित टप्प्यांमध्ये प्रचार करू शकणार नाही.
अन्य नेते प्रचारासाठी जाणार नाहीत
पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रभारी जितेंद्र प्रसाद यांनाही सोमवारी वाढत्या कोरोना संसर्गामुळे राज्यात प्रचारासाठी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच दिवशी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले व त्यांनीही पश्चिम बंगालमधील सर्व रॅली रद्द केल्या. प्रियांका गांधीही यांनीही राज्यात प्रचार न करता दिल्लीत राहण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या नेतृत्त्वाने राज्यात अन्य कोणत्या स्टार प्रचारक नेत्याला पाठवण्याचा निर्णय घेतलेला नाही. चौधरी यांनी याला दुजोरा दिला आहे.