Congress CWC Meeting: काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष? कार्यकारणी समितीची आज महत्त्वाची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 09:10 AM2021-10-16T09:10:33+5:302021-10-16T09:13:02+5:30
काँग्रेसच्या कार्यकारणीच्या या बैठकीत संघटनात्मक निवडणुकांना हिरवा कंदील दाखवला जाऊ शकतो.
नवी दिल्ली – संसदेतील विरोधी पक्ष काँग्रेसच्या कार्यकारणीची सकाळी १० च्या सुमारास महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेसच्या नवीन अध्यक्ष(Congress President) निवडीवर निर्णय घेतला जाऊ शकतो. काँग्रेस कार्यकारणीच्या या बैठकीत कुठल्याही शिस्तभंगाच्या कारवाईवर चर्चा होणार नाही. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीबाबत या बैठकीत विचारविनिमय केला जाणार आहे. पक्षात सर्वांना सामावून घेण्याबाबत यात चर्चा होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या कार्यकारणीच्या या बैठकीत संघटनात्मक निवडणुकांना हिरवा कंदील दाखवला जाऊ शकतो. यात अध्यक्ष पदासाठी निवडणूकही घेतली जाण्याची शक्यता आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पक्षाचं अंतरिम अध्यक्ष बनवलं होतं. आजच्या कार्यकारणी बैठकीत अध्यक्षपदावर तोडगा काढला जाऊ शकतो. जिल्हा स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत निवडणूक पार पडेपर्यंत सोनिया गांधी अध्यक्षपदावर कायम असतील.
काँग्रेस पक्षातील असंतुष्ट नेत्यांच्या गटाने जी २३(G 23) ज्यात गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा सहभागी आहेत त्यांनी पक्षातंर्गत निवडणुका घेण्याचा मुद्दा उचलला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, अनेक नेत्यांचे म्हणणे आहे की, काँग्रेसनं सदस्यता अभियान सुरू करावं. स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत निवडणुका घ्याव्यात. यात काँग्रेस पक्षाला पूर्णकालीन अध्यक्ष असावा यासाठीही निवडणूक घ्यावी. पुढील वर्षी २०२२ मध्ये उत्तर प्रदेश, पंजाबसह अनेक महत्त्वपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.
तर काही नेत्यांचे म्हणणं आहे की, पक्षाचं लक्ष काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीऐवजी या राज्यातील निवडणुका जिंकण्याकडे जास्त असावं. काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह मागील वर्षी जी २३ गटाने पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्यामुळे समोर आलं होतं. यात पक्षात बदल करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. पक्षाला नेतृत्व आणि चेहरा द्यावा अशी मागणी पत्रात करण्यात आली होती. यातच काँग्रेससमोर सध्या पंजाब, छत्तीसगड यासारख्या राज्यातही संकट निर्माण झालं आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, सुष्मिता देव, लुइजिन्हो फलेरियो सारखे नेते पक्षाबाहेर पडले आहेत. काँग्रेसच्या युवा नेत्यांनी याआधीच पक्षाला रामराम केला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत बदल करावेत असं काही नेत्यांना वाटत आहे.