गांधी कुटुंबियांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून मुद्दाम त्रास; संजय राऊत यांचा आरोप
By मोरेश्वर येरम | Published: January 7, 2021 10:32 AM2021-01-07T10:32:38+5:302021-01-07T10:34:21+5:30
राहुल गांधी हे विरोधी पक्षाचे नेते आहेत. त्यांच्याबाबद अपशब्द वापरुन बोलणं ही काही आपली संस्कृती नाही, असं राऊत म्हणाले
मुंबई
देशात गांधी कुटुंबिय आणि विरोधकांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून मुद्दाम त्रास दिला जातोय, असा थेट आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.
"राहुल गांधी हे विरोधी पक्षाचे नेते आहेत. त्यांच्याबाबद अपशब्द वापरुन बोलणं ही काही आपली संस्कृती नाही. गेल्या अनेक दिवसांपासून गांधी कुटुंबियांना आणि विरोधकांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून मुद्दाम त्रास देण्याचं काम सुरू आहे", असं संजय राऊत म्हणाले.
कुणी कितीही प्रयत्न करा, काही साध्य होणार नाही
"केंद्रीय तपास यंत्रणांकडून विरोधकांना आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात आम्ही सुद्धा आलो. गांधी कुटुंबिय देखील आले. पण कुणी कितीही प्रयत्न केला तरी काहीच साध्य होणार नाही. आगामी काळात विरोधीपक्ष फिनिक्स पक्ष्याप्रमाणं भरारी घेईल हा आपला आजवरचा इतिहास राहीला आहे", असंही राऊत म्हणाले.
'सामना'मध्ये राहुल गांधींचं कौतुक
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या आजच्या अग्रलेखात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं कौतुक करण्यात आलं आहे. "राहुल गांधींचे भय हे दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना वाटते. लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटते व हा एकटा योद्धा प्रामाणिक असेल तर भय शंभर पटीने वाढत जाते. राहुल गांधींचे भय त्या शंभर पटीतले आहे, अशा शब्दांत 'सामना'तून राहुल यांचे कौतुक करण्यात आले आहे.
राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होत आहेत ही अतिशय चांगली गोष्ट असल्याचंही अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे. भाजपला मोदींशिवाय व काँग्रेसला गांधींशिवाय पर्याय नाही हे सत्य स्वीकारावे लागेल. काही काळासाठी गांधी दूर जातच पक्ष होता त्यापेक्षा जास्तच खाली घसरला, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.