...तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडेंसमोरच दिल्या होत्या विरोधाच्या घोषणा!
By कुणाल गवाणकर | Published: January 14, 2021 04:26 PM2021-01-14T16:26:16+5:302021-01-14T16:28:32+5:30
बलात्काराच्या आरोपांमुळे धनंजय मुंडे अडचणीत; राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता
मुंबई: गायिकेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दलची भूमिका पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केली आहे. मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यांनी माझ्याकडे सविस्तर माहिती दिली आहे. आता पक्षातील वरिष्ठ सहकाऱ्यांशी बोलून याबद्दलचा निर्णय घेतला जाईल, असं शरद पवार म्हणाले.
धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल केलं जातंय, त्यांच्या राजीनाम्याची कोणतीही चर्चा नाही: जयंत पाटील
धनंजय मुडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलं. काल त्यांनी सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन स्वत:ची भूमिका सविस्तरपणे मांडली. याबद्दल सांगताना पवार यांनी मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे असल्याचं म्हटलं आहे. पक्षातल्या वरिष्ठ सहकाऱ्यांना मुंडे यांनी मला दिलेली माहिती सांगेन. त्यानंतर पक्ष योग्य तो निर्णय घेईल, असं पवार आज माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. मुंडेंवरील आरोप गंभीर स्वरुपाचे असल्याचं पवार यांनी म्हटल्यानं मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर, लवकरच निर्णय घेऊ; शरद पवारांचे मोठे संकेत
२०१९ मधील 'ते' काही तास अन् घोषणाबाजी
धनंजय मुंडे अडचणीत आले असताना अनेकांना २०१९ मध्ये घडलेल्या घटनेची आठवण झाली आहे. त्यावेळी मुंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी लवकर राजभवनात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. शिवसेना, काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असताना अजित पवारांनी थेट फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतल्यानं शरद पवार प्रचंड नाराज झाले होते. त्यावेळी धनंजय मुंडे शपथविधीनंतरचे अनेक तास नॉट रिचेबल होते. अनेक तासांनी ते पक्षकार्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोरच जोरदार घोषणाबाजी केली होती.
मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत धनंजय मुंडेंचं मोठं विधान, म्हणाले...
शरद पवारांच्या विश्वासाला तडा?
धनंजय मुंडे शरद पवारांच्या 'गुड बुक'मध्ये होते. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बीडमधील परळी मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडेंकडून ते २५ हजारांनी पराभूत झाले. मात्र तरीही पवारांनी मुंडेंना विधानपरिषदेत पाठवलं आणि त्यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ घातली होती. पुढे २०१९ मध्ये धनंजय यांनी पंकजा यांचा पराभव केला. मात्र निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीनं काँग्रेस, शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापनेची तयारी सुरू असताना अजित पवारांनी केलेलं बंड आणि त्यादरम्यान धनंजय मुंडेंचं नॉटरिचेबल असणं यावरून शरद पवार नाराज झाले होते. या घटनेमुळे पवारांच्या मनात मुंडेंबद्दल असलेल्या विश्वासाला कुठेतरी तडा गेल्याचं राजकीय जाणकारांना वाटतं.