पंजाब, राजस्थाननंतर आता अजून एका राज्यात काँग्रेसमध्ये उफाळला असंतोष, अनेक मोठे नेते नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 02:51 PM2021-06-15T14:51:21+5:302021-06-15T15:04:14+5:30
Congress News: राजस्थान आणि पंजाबमध्ये आधीपासूनच अंतर्कलहाचा सामना करत असलेल्या काँग्रेससमोर आता अजून एका राज्यात पक्षांतर्गत नाराजीमुळे आव्हान उभे राहिले आहे.
नवी दिल्ली - गेल्या काही काळापासून वाढत असलेल्या पक्षांतर्गत असंतोषामुळे काँग्रेससमोरील समस्येत भर पडली आहे. राजस्थान आणि पंजाबमध्ये आधीपासूनच अंतर्कलहाचा सामना करत असलेल्या काँग्रेससमोर आता अजून एका राज्यात पक्षांतर्गत नाराजीमुळे आव्हान उभे राहिले आहे. उत्तरेतील राज्यांनंतर आता दक्षिणेतील केरळमध्ये काँग्रेस (Congress ) पक्षात असंतोष उफाळून आला आहे. केरळ काँग्रेसमधील एक गट पक्षाच्या हायकमांडकडून दुर्लक्ष होत असल्याने नाराज आहे. (Dissatisfaction erupted in the Congress in Kerala after Punjab and Rajasthan, angering many big leaders)
एकीकडे पंजाब आणि राजस्थानमधील घडामोडींमुळे पक्ष अडचणीत सापडता असताना आता दक्षिणेतील केरळ काँग्रेसमध्येही नाराजी पसरली आहे. केरळ विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्याने पक्षाने केरळ प्रदेशाध्यक्ष एम. रामचंद्रन आणि विरोधीपक्ष नेते रमेश चेन्निथला यांना हटवल्यानंतर राज्य काँग्रेसमध्ये नाराजीचा विस्फोट झाला आहे. गेल्या महिन्यात लागलेल्या केरळ विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये यूडीएफ या डाव्या पक्षांच्या आघाडीने विजय मिळवला होता.
रमेश चेन्निथला यांच्या गटातील नेत्यांनी आरोप केला की, त्यांना सन्मानजनक निरोपासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्यासाठीही वेळ देण्यात आला नाही. तसेच राज्यातील प्रदेशाध्यक्षांची आमि विरोधा पक्षनेत्याची घोषणा करताना त्यांचा सल्लाही घेण्यात आला नाही. व्ही.डी. सतीशन यांना केरळमधील विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त करण्यात आले आहे. तर के. सुधाकरन यांना केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे.
रमेश चेन्निथला यांच्या अजून एका निष्ठावंत कार्यकर्त्याने सांगितले की, ते सन्मानजनक निरोपाचे हक्कदार होते. काँग्रेसच्या अध्यक्षा किंवा राहुल गांधी परिस्थिती समजून घेण्यासाठी त्यांनी बैठकीसाठी बोलावू शकले असते. अखेरीस नवे चेहरे समोर आणण्याची काय गरज होती. माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांचाही सल्ला न घेता हे बदल करण्यात आले.
मात्र अन्य एका नेत्याने सांगितले की, बहुतांश तरुण आमदार आणि खासदारांनी पक्षात काही बदल करण्याची मागणी केली आहे. राज्याचे प्रभारी तारीक अन्वर यांनी याबाबत आमदार, खासदार आणि नेत्यांसोबत अनेकदा चर्चा केली आहे.