Poll: भारतीय घटनेत देशद्रोहाचं कलम असावं की नसावं?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 03:18 PM2019-04-04T15:18:16+5:302019-04-04T15:49:48+5:30
सत्तेत आल्यास देशद्रोहाचं कलम रद्द करण्याचं काँग्रेसचं आश्वासन
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं दोनच दिवसांपूर्वी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. सत्तेत आल्यास देशद्रोहाचं कलम रद्द करण्याचं आश्वासन काँग्रेसनं जाहीरनाम्यातून दिलं. काँग्रेसच्या या घोषणेवरुन भाजपानं टीकेची झोड उठवली. देशद्रोहाचं कलम रद्द झाल्यास फुटिरतावादी शक्तींना बळ मिळेल, अशी भीती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली. काँग्रेसचा हात देशासोबत आहे की देशद्रोह्यांसोबत, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेसनं भारतीय दंड संहितेमधील कलम 124 अ वगळण्याचं आश्वासन दिल्यानं मोठा वादंग माजला. गेल्या दोन दिवसांपासून राजकारणात या मुद्द्याची चर्चा आहे. पंतप्रधान मोदींसह अर्थमंत्री अरुण जेटलींनीदेखील यावरुन काँग्रेसवर शरसंधान साधलं. देशद्रोहाचं कलम रद्द केल्यास देशद्रोही कारवायांना वेग येईल, अशी भीती भाजपाकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर काहींनी हे कलम ब्रिटिशांच्या काळातलं असल्यानं ते रद्द करण्याची भूमिका घेतली आहे. ब्रिटिशांनी त्यांच्याविरोधातल्या कारवाया हाणून पाडण्यासाठी देशद्रोहाचं कलम लागू केलं होतं. त्यामुळे त्यांच्या काळातील कायद्याची आता गरजच काय, असा सवालदेखील काहींकडून उपस्थित होत आहे.