“कुणालाही सांगू नका, कमलनाथ सरकार पाडण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाची भूमिका”
By प्रविण मरगळे | Published: December 17, 2020 10:06 AM2020-12-17T10:06:51+5:302020-12-17T10:08:16+5:30
आम्ही आजपर्यंत जे आरोप केले त्याला विजयवर्गीय यांनी दुजोरा दिला आहे.
इंदूर – मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकार पाडण्यासाठी कोणाची महत्त्वाची भूमिका राहिली असेल तर ती पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे असं मोठं विधान भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी केलं आहे. इंदूर येथे शेतकरी मेळाव्याला ते संबोधित करत होते. त्यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि कृषी कायद्यावर सुरु असलेल्या गदारोळामध्ये भाजपाने देशातील विविध शहरात शेतकरी संमेलनाचं आयोजन केले आहे. इंदूर येथे शेतकरी संमेलनाची जबाबदारी कैलास विजयवर्गीय आणि नरोत्तम मिश्रा यांना देण्यात आली. यावेळी भाषणादरम्यान कैलास विजयवर्गीय म्हणाले की, जोपर्यंत कमलनाथ सरकार मध्य प्रदेशात होती, एकदिवसही सुखाने झोपू दिले नाही. कमलनाथ यांना स्वप्नातही भाजपाचा कार्यकर्ता दिसत असेल ते नरोत्तम मिश्रा आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच पडद्यामागील गोष्ट सांगतो, कुणालाही सांगू नका, मीदेखील आजपर्यंत कोणाला सांगितलं नाही. पहिल्यांदाच या व्यासपीठावरून सांगत आहे, कमलनाथ यांचे सरकार पाडण्यामध्ये जर कोणाची महत्त्वाची भूमिका असेल तर ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. धर्मेंद प्रधान यांची नव्हती, ही गोष्ट कोणालाही सांगू नका, मीदेखील कोणाला बोललो नाही असं कैलाश विजयवर्गीय यांनी सांगितले.
कैलाश विजयवर्गीय यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसनं सांगितले की, आम्ही आजपर्यंत जे आरोप केले त्याला विजयवर्गीय यांनी दुजोरा दिला आहे. काँग्रेसच्या सर्व आरोपांची खातरजमा स्वत: भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी शेतकरी संमेलनात दिली आहे. प्रदेशातील लोकप्रिय आणि जनादेशाचं कमलनाथ सरकार नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यावर पाडण्यात आलं असं काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलूजा यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेसचं सरकार पाडण्यामध्ये आमचं काहीही योगदान नाही असं भाजपा सुरुवातीपासून खोटं बोलत आहे, काँग्रेसच्या अंतर्गत वादातून कमलनाथ सरकार पडलं पण आज कैलाश विजयवर्गीय यांच्या विधानामुळे हे स्पष्ट झालं आहे की काँग्रेसने केलेले आरोप सत्य आहेत. भाजपा लोकांची फसवणूक करत आहे, काँग्रेस सरकार असंवैधानिकपणे पाडण्यात देशाच्या सर्वोच्च पदावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात आहे असंही काँग्रेसने सांगितले.