कमलनाथांवर निवडणूक आयोगाचा जोरदार प्रहार; काढून घेतला प्रचारकाचा स्टार
By हेमंत बावकर | Published: October 30, 2020 08:15 PM2020-10-30T20:15:46+5:302020-10-30T20:17:34+5:30
Kamalnath : कमलनाथ यांनी वारंवार आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.
भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद गमावणाऱ्या काँग्रेसच्या कमलनाथांवर निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. मध्य प्रदेशमध्ये 28 जागांवर पोटनिवडणूक होत असून प्रचारावेळी भाजपाच्या महिला उमेदवाराला आयटम म्हणणे कमलनाथांना आणि काँग्रेसला भारी पडले आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याने त्यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे.
कमलनाथ यांनी वारंवार आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. निवडणूक आयोगाच्या या कारवाईवर काँग्रेसने न्य़ायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. नरेंद्र सलूजा यांनी सांगितले की, पक्ष कमलनाथ यांच्यावर आयोगाने केलेल्या कारवाईविरोधात न्यायालयात जाणार आहे.
कमलनाथ यांनी भाजपाच्या उमेदवार इमरती देवी यांना आयटम असे संबोधले होते. यावरून वाद होताच त्यांनी मला नाव आठवत नव्हते, म्हणून आयटम म्हटल्याची सारवासारव केली होती. तसेच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना नौटंकी कलाकार असेही म्हटले होते. या दोन्ही वक्तव्यांविरोधात भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. यावर निव़डणूक आयोगाने ही कारवाई केली आहे.
Congress party to move court against Election Commission's revocation of party leader Kamal Nath's star campaigner status: Narendra Saluja, media coordinator for Madhya Pradesh unit of Congress https://t.co/M0N1tcfoV7
— ANI (@ANI) October 30, 2020
निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, कमलनाथ यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यांना वेळोवेळी समजही देण्यात आली होती. तरीही त्यांनी आचारसंहिता भंग करणे सुरुच ठेवल्याने ही कारवाई केली आहे. आचारसंहिता कलम एक आणि दोन नुसार ही कारवाई केली असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
किती फटका बसणार
कमलनाथ यांचे स्टार प्रचारक पद गेल्याचा फटका काँग्रेसला बसणार नसला तरीही त्यांच्या उमेदवारांना बसणार आहे. कमलनाथ यापुढेही प्रचारसभा घेऊ शकणार आहेत. मात्र, या सभांचा खर्च पक्षाच्या खात्यात नाही तर उमेदवारांच्या खात्यात मोजला जाणार आहे.
केरळमधील वायनाड मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींना पत्रकार परिषदेदरम्यान, कमलनाथ यांच्या आक्षेपार्ह विधानाबाबत विचारले असता ते म्हणाले की, कमलनाथ माझ्या पक्षाचे आहेत. मात्र त्यांनी वापरलेली भाषा मला व्यक्तिगतरीत्या मान्य नाही. कुणीही असो मी अशा भाषेला अजिबात मान्य करणार नाही. कुणीही असो, अशी भाषा वापरणे चुकीचे आहे. राहुल गांधी यांनी पुढे सांगितले की, सामान्यपणे, मला वाटते की, देशातील महिलांबाबत प्रत्येक पातळीवर आपल्या व्यवहारात सुधारणा होण्याची गरज आहे. मग कायदा आणि सुव्यवस्था असो वा आदरभाव असो. सरकार, व्यवसाय आणि कुठल्याही अन्य क्षेत्रात त्यांच्या स्थानाबाबत असो. देशातील महिला देशाचा गौरव आहे, त्याचे रक्षण झाले पाहिजे.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेल्या कमलनाथ यांनी शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आणि डबरा विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुतील भाजपा उमेदवार असलेल्या इमरती देवी यांचे नाव न घेता आयटम असा उल्लेख केला होता. या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला असून, कमलनाथ यांच्यावर जोरदार टीका झाली होती.