"मला आता आराम हवाय", मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ राजकीय सन्यास घेणार?
By मोरेश्वर येरम | Updated: December 14, 2020 15:32 IST2020-12-14T15:29:46+5:302020-12-14T15:32:53+5:30
काँग्रेसमध्ये कमलनाथ यांच्याविरोधात वारंवार आवाज उठवला जात असताना त्यांनी केलेल्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

"मला आता आराम हवाय", मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ राजकीय सन्यास घेणार?
छिंदवाडा
मध्य प्रदेशात सरकार गमावल्यावर आणि पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मोठं विधान केलंय. छिंदवाडा येथील काँग्रेसच्या एका कार्यक्रमात संबोधित करताना कमलनाथ यांनी राजकारणाला 'रामराम' करण्याचे संकेत दिले आहेत.
"मला आता आरामाची गरज आहे. मी आतापर्यंत खूप प्रगती केलीय", असं कमलनाथ म्हणाले. काँग्रेसमध्ये कमलनाथ यांच्याविरोधात वारंवार आवाज उठवला जात असताना त्यांनी केलेल्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कमलनाथ केवळ राजकीय पद सोडण्याच्या नव्हे, तर राजकारणातूनच सन्यास घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. कमलनाथ सध्या त्याच्या मुलासह छिंदवाडाच्या दौऱ्यावर आहेत. छिंदवाडा कमलनाथ यांचा बालेकिल्ला मानला जातो.
कमलनाथ हे मध्य प्रदेश विधानसभेत विरोधीपक्ष नेत्यासह काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष देखील आहेत. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसला सपाटून मार खावा लागल्यानंतर काँग्रेसमध्येच कमलनाथ यांच्या नेतृत्त्वाबाबत प्रश्न उपस्थित केले गेले. चुकीचे तिकीट वाटप, कमकुवत उमेदवार आणि चुकीची रणनिती आखल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले.
आधी सरकार पडलं मग पोटनिवडणुकीतही सपशेल पराभव
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्रिपदासाठी कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात चढाओढ पाहायला मिळाली होती. अखेरीस ज्येष्ठतेच्या मुद्द्यावरुन कमलनाथ यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली. काही काळाने ज्योतिरादित्य यांनी भाजपची वाट धरली आणि काँग्रेसला रामराम ठोकला.
ज्योतिरादित्य यांच्या जाण्याने मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता गेली. ज्योतिरादित्य समर्थक आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि कमलनाथ सरकार पडलं. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.