सिंधिया व्हा, भाजपामध्ये जा; कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद यांना आठवलेंचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 09:05 AM2020-09-02T09:05:14+5:302020-09-02T09:19:14+5:30
पक्ष वाढवणाऱ्या नेत्यांवर आरोप करणं चुकीचं; आठवलेंचं राहुल गांधींवर शरसंधान
मुंबई: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी त्यांच्याच पक्षातल्या कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद यांच्यासारख्या नेत्यांवर आरोप करत असतील, तर त्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा. आम्ही त्यांच्या स्वागताला तयार आहोत, असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.
भाजप पुढील अनेक वर्षे सत्तेत असणार आहे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सिब्बल आणि आझाद यांच्यावर भाजपशी हातमिळवणी केल्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे त्या नेत्यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासारखं पाऊल उचलायला हवं, असा सल्ला आठवलेंनी सिब्बल आणि आझाद यांना दिला. गेल्या आठवड्यात अध्यक्ष निवडीसाठी काँग्रेसची एक बैठक झाली. त्या बैठकीआधी काँग्रेसच्या देशातल्या २३ मोठ्या नेत्यांनी पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष देण्याची मागणी करणारं पत्र सोनिया गांधींना लिहिलं होतं. त्यावरून राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केली होती. त्या २३ नेत्यांमध्ये गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांच्या नावांचा समावेश होता. पत्र लिहिणाऱ्या नेत्यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप राहुल यांनी केल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे मोठा वादंग माजला होता.
Ghulam Nabi Azad & Kapil Sibal have done a lot of work to build Congress. If Rahul Gandhi ji is putting allegations against them, they should leave the party. We're ready to welcome them in BJP: Union Minister & Republican Party of India leader Ramdas Athawale (01.09.2020) pic.twitter.com/mYnKmUaS2D
— ANI (@ANI) September 1, 2020
आठवलेंनी या बैठकीचा आणि त्यातील घडामोडींचा संदर्भ देत आझाद आणि सिब्बल यांना काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा सल्ला दिला. 'काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरून वाद आहे. राहुल गांधींनी सिब्बल आणि आझाद यांच्यावर भाजपशी संगनमत केल्याचा आरोप लावला आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा. त्यांनी काँग्रेसच्या विस्तारासाठी आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे दिली आहेत. मात्र आता त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपत प्रवेश करायला हवा,' असं आठवले म्हणाले.
मंदिर-मशीद उघडा अन्यथा आंदोलन, वंचितनंतर रिपाइंला 'आठवले' प्रार्थनास्थळ
काँग्रेसमध्ये अपमान होत असेल, तर आझाद आणि सिब्बल यांनी पक्षातून बाहेर पडायला हवं. त्यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासारखं पाऊल उचलायला हवं. इतकंच काय सचिन पायलट यांनीदेखील तसंच केलं होतं. पण मग त्यांनी माघार घेऊन समेट घडवला. काँग्रेससाठी घाम गाळणाऱ्या, कष्ट करणाऱ्या नेत्यांवर राहुल यांनी अशा प्रकारे आरोप करणं चुकीचं असल्याचं आठवलेंनी म्हटलं.
रामदास आठवलेंनी घेतली सुशांतच्या वडिलांची भेट, रियाबद्दल व्यक्त केला संशय