राहुल गांधी लेझर गनच्या निशाण्यावर होते?; गृह मंत्रालय म्हणतं...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 07:37 PM2019-04-11T19:37:48+5:302019-04-11T19:53:13+5:30
राहुल गांधींना अधिक सुरक्षा देण्याची काँग्रेसची मागणी
नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याचा आरोप गृह मंत्रालयानं फेटाळला. अमेठीत लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या राहुल गांधींच्या चेहऱ्यावर लेझर लाईट असलेला फोटो व्हायरल झाला. यानंतर राहुल गांधींच्या जीवाला धोका असून त्यांना कडेकोट सुरक्षा पुरवली जावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली. मात्र राहुल गांधींच्या चेहऱ्यावर पडलेला तो प्रकाश लेझर गनचा नसून त्यांच्या आसपास असलेल्या फोटोग्राफर्सच्या मोबाइल फोनचा असल्याचं गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं.
राहुल गांधी अमेठीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया देत असताना त्यांच्या चेहऱ्यावर काही वेळा हिरव्या रंगाचा लेझर लाइट दिसला. हा प्रकाश तिथे उपस्थित असलेल्या पत्रकाराच्या मोबाइलचा असल्याची माहिती गृह मंत्रालयानं दिली. विशेष सुरक्षा दलाकडून घेण्यात आलेल्या माहितीनंतर गृह मंत्रालयानं हे स्पष्ट केलं. राहुल गांधींच्या डोक्यावर दोन ते तीन वेळा हा प्रकाश दिसल्यानं काँग्रेसनं चिंता व्यक्त केली. त्यानंतर काँग्रेसनं गृह मंत्रालयाला पत्र लिहिलं. त्यामधून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येचा संदर्भ देत राहुल यांना चोख सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
बुधवारी राहुल गांधींनी अमेठीत उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या पूर्व विभागाच्या महासचिव प्रियंका गांधी आणि त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी राहुल गांधींनी अमेठीत मोठा रोड शो केला. यामध्ये मोठ्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.