काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 11:56 AM2024-09-22T11:56:16+5:302024-09-22T11:58:24+5:30

Haryana Assembly Election Kumari Shailja : मुख्यमंत्रि‍पदासाठी इच्छुक असलेल्या काँग्रेसच्या बड्या नेत्या कुमारी शैलजा नाराज आहेत. त्यांच्या नाराजीवरून भाजपने हरियाणात काँग्रेसला घेरण्यासाठी नवा डाव टाकला. 

How Congress got into trouble due to Kumari Shailaja's upset, Manohar Lal Khattar offered to join BJP | काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव

काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव

Haryana Assembly Election 2024 Congress : हरियाणा काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे काँग्रेसला घेरण्याची आयती संधी भाजपाला मिळाली आहे. काँग्रेसच्या नेत्या खासदार कुमारी शैलजा या नाराज आहे. विधानसभा निवडणुकीत भूपेंद्र सिंह हुड्डा गटाच्या वर्चस्वामुळे शैलजा गट बाजूला गेला असून, कुमारी शैलजा यांनी प्रचारापासूनही अंतर राखले आहे. त्यांच्या मौनामुळे काँग्रेसमधील दोन्ही गटातील सुप्त संघर्षाची जोरात चर्चा सुरू असून, भाजपाने थेट शैलजा यांना पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे. ऐन मतदानाच्या आधी भाजपाने दलित मुद्द्यावरून काँग्रेसला घेरले आहे.

हरियाणात भाजपा विरुद्ध काँग्रेस राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला, जेव्हा केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी खासदार कुमारी शैलजा यांना भाजपात येण्याची ऑफर दिली. खट्टर यांनी शैलजा यांना भाजपात येण्याची ऑफर देण्याबरोबरच काँग्रेसला दलित विरोधी मुद्द्यावरून कोंडीत पकडले. 

कुमारी शैलजा यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर, खट्टर काय बोलले?

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या केंद्रीय मंत्री असलेल्या मनोहर लाल खट्टर यांनी काँग्रेसवर टीका केली. "काँग्रेसमध्ये दलितांचा अपमान झाला आहे आणि शैलजा यांना अपशब्द ऐकावे लागले आहेत. आता त्या घरी बसल्या आहेत. जर शैलजा भाजपामध्ये येणार असतील, तर त्यांचे स्वागत आहे", असे खट्टर म्हणाले. 

"त्यांचा अपमान करूनही काँग्रेसला लाज वाटत नाही. आज एक मोठा गट विचार करत आहे की, काय करायला हवे. आम्ही अनेक नेत्यांना आमच्यासोबत घेतले आहे आणि आम्ही त्यांना (कुमारी शैलजा) सोबत घ्यायला तयार आहोत", असेही खट्टर म्हणाले. 

मल्लिकार्जून खरगेंचा पलटवार

मनोहर लाल खट्टर यांनी केलेल्या टीकेनंतर आणि शैलजा यांना भाजपा प्रवेशाची ऑफर दिल्यानंतर काँग्रेसनेही पलटवार केला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी खट्टर यांच्या टीकेला उत्तर दिले. 

"भाजपने आधी स्वतःचे घर नीट करावे. इतक्या नेत्यांनी पक्ष सोडला आहे. ते (भाजप) आमच्याबद्दल कशाला चिंता करत आहेत? त्यांनी आधी त्यांच्या पक्षाची चिंता करावी", असे खरगे म्हणाले. 

शैलजा यांच्या नाराजीबद्दल काँग्रेसचे हरियाणातील नेते दीपेंद्र हुड्डा यांनी भाष्य केले. "काँग्रेसचे सर्व नेते मिळून मिसळून निवडणूक लढवतील. सगळे तुम्हाला प्रचारात दिसतील. भाजपाचे सरकार बदलण्याचा निर्णय लोकांनी घेतला आहे", असे ते म्हणाले. 

शैलजांची नाराजी, विरोधकांनी दलित मुद्द्यावरून घेरले

खासदार कुमारी शैलजा या नाराज आहेत. त्या काँग्रेसच्या प्रचारात दिसत नाही. त्यांच्या नाराजीचा मुद्दा विरोधकांनी काँग्रेसला कोंडीत पकडण्यासाठी शस्त्र बनवल्याचे दिसत आहे. काँग्रेसमध्ये दलितांचा अपमान होतो, हे खट्टरच नाही, तर भाजपाचे नेते अनुराग ठाकूरही म्हणाले आहेत. 

मायावती यांच्या बहुजन समाज पक्षानेही यावरून काँग्रेसला निशाणा बनले आहे. पक्षाचे नेते आकाश आनंद यांनीही काँग्रेसने शैलजा यांचा अपमान केल्याची टीका केली आहे. "हरियाणाची दलित कन्या यांना सहन होत नाही. मग हे लोक आमचा सन्मान काय करतील? कुमारी शैलजा यांच्याबद्दल हुड्डा समर्थक किती वाईट बोलत आहेत, तरीही हे लोक गप्प आहेत. काँग्रेस दलितांना कधीच सन्मान देत नाही आणि भविष्यातही देणार नाही", असे आनंद म्हणाले. 
 
कुमारी शैलजा का आहेत नाराज? 

हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये भूपेंद्र सिंह हुड्डा यांचे वर्चस्व दिसत आहे. कुमारी शैलजा यांना विधानसभेची निवडणूक लढवायची होती. पण, त्यांना दूर ठेवले गेले. महत्त्वाचे म्हणजे तिकीट वाटपात शैलजा यांच्या समर्थकांना डावलण्यात आले. त्यामुळे शैलजा या नाराज आहेत. त्या प्रचारापासून दूर आहेत. हीच बाब आता विरोधकांनी काँग्रेसला घेरण्यासाठी उचलून धरली आहे. 

Web Title: How Congress got into trouble due to Kumari Shailaja's upset, Manohar Lal Khattar offered to join BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.