Monsoon Session:'हा तर संसदेचा, घटनेचा, लोकशाहाची आणि लोकांचा अपमान'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 12:25 PM2021-08-03T12:25:47+5:302021-08-03T12:28:54+5:30
Parliament Monsoon Session: राहुल गांधींनी बोलावली 'ब्रेकफास्ट मीटिंग', 14 पक्षांचे 100 खासदार उपस्थित
नवी दिल्ली: 19 जुलै रोजी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. पण, पहिल्या दिवसापासून पेगासस फोन टॅपिंग प्रकरणावरुन विरोधकांकडून संसदेत गोंधळ सुरू आहे. विरोधकांच्या या गोंधळामुळे संसदेची कार्यवाही अनेकदा स्थगित करावी लागत आहे. दरम्यान, आज(दि.3) भाजपा खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(PM Narendra Modi) विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
पेगासस, करोना स्थिती, शेतकरी आंदोलन तसंच अन्य मुद्द्यांवरुन विरोधकांकडून लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ घातला जात असून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यानंतर आज विरोधक संसदेचं कामकाज सुरळीत चालू देत नसल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. तसेच, विरोधकांकडून वारंवार संसेदचं कामकाज बंद पाडणं हा संसदेचा, घटनेचा, लोकशाहाची आणि लोकांचा अपमान आहे, असे म्हटले. संसदेच्या कामकाजावरुन विरोधकांवर टीका करण्याची ही मोदींची एका आठवड्यातील दुसरी वेळ आहे.
विरोधकांना एक्सपोज करण्याच्या सूचना
यापूर्वी, 27 जुलै रोजी बोलावलेल्या भाजपा खासदारांच्या बैठकीतही मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. देशातील कोरोना परिस्थितीवर बोलावलेल्या बैठकीचा काँग्रेसने बहिष्कार केला आणि इतर पक्षांनाही येऊ दिले नाही, असा आरोप मोदींनी केला. तसेच, त्या बैठकीत मोदींनी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या कामांना जनता आणि मीडियासमोर एक्सपोज करण्याच्या सूचना आपल्या खासादारांना दिल्या होत्या.
राहुल गांधींची ब्रेकफास्ट बैठक
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांना एकत्र करत मोदी सरकारला घेरण्यासाठी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. राहुल गांधी यांनी देशातील विरोधी पक्षांच्या खासदारांची एक बैठक बोलावली आहे. ही ब्रेकफास्ट मिटिंग कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये होत आहे. या बैठकीला देशातील 14 पक्षांचे जवळफास 100 खासदार उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. बैठकीत तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोइत्रा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, शिवसेनेचे संजय राऊत उपस्थित होते.