Jitin Prasada : "जितिन यांचा पक्षाला रामराम म्हणजे काँग्रेसच्या तोंडावर मारलेली मोठी चपराक"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 09:43 AM2021-06-10T09:43:36+5:302021-06-10T09:56:31+5:30
Jitin Prasada Joining BJP : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे
नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांचे निकटवर्तीय मानले जाणारे युवा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद (Jitin Prasada) भाजपामध्ये (BJP) सामील झाले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मागच्या वर्षी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पत्र लिहून संघटनात्मक निवडणूक घेण्याची मागणी करणाऱ्या 23 नेत्यांमध्ये जितिन प्रसाद यांचाही समावेश होता. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि भाजपचे खासदार अनिल बलुनी यांच्या उपस्थितीत जितिन प्रसाद यांना बुधवारी भाजपाचे सदस्यत्व देण्यात आले. याच दरम्यान काँग्रेसचे नेते हरीश रावत (Harish Rawat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"जितिन यांचा पक्षाला रामराम म्हणजे काँग्रेसच्या तोंडावर मारलेली मोठी चपराक" असल्याचं हरीश रावत यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांचा हा निर्णय न समजण्यासारख्या असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. "जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश करणे हे म्हणजे आमच्या तोंडावर मारलेली मोठी चपराक आहे. हे खूपच दु:खद आणि निराश करणारं आहे. त्यांनी काँग्रेसला स्थानिक पक्ष म्हटल्याने मला आश्चर्य वाटलं. तसेच त्यांच्या कुटुंबियांनी या पक्षाविरोधात संघर्ष केला त्यामध्येच त्यांनी प्रवेश केला हे गोंधळून टाकणारं आहे" असं हरीश रावत यांनी म्हटलं आहे.
Jitin Prasada joining BJP is like a big slap on our face. It is sad & disheartening. I'm surprised that he called Congress a regional party & joined the party against which his family fought: Congress leader Harish Rawat pic.twitter.com/luSfbnZ9Ma
— ANI (@ANI) June 9, 2021
जितिन प्रसाद म्हणाले की, काँग्रेसमध्ये राहून जनतेच्या हिताचे रक्षण करणे शक्य नव्हते. आज देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या कुशल आणि खंबीर नेतृत्वाची आणि भाजपसारख्या मोठ्या संघटनेची गरज आहे. भाजपच खऱ्या अर्थाने देशातील एकमेव राजकीय पक्ष होय. आजपासून माझ्या राजकीय जीवनाचा नवीन अध्याय सुरू होत आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यानंतर भाजपामध्ये सामील होणारे जितिन प्रसाद हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले दुसरे नेते आहेत. जितिन प्रसाद हे माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र प्रसाद (शाहजहाँपूर, उत्तर प्रदेश) यांचे पुत्र आहेत.
जितिन प्रसाद काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल, पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
राजीव गांधी आणि पी. व्ही. नरसिंह राव यांचे निकटवर्तीय असलेले जितेंद्र प्रसाद यांनी सोनिया गांधी यांच्याविरुद्ध काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूकही लढविली होती. जितिन प्रसाद हे 2004 मध्ये शाहजहाँपूर आणि 2009 मध्ये धौरहर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये ते युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री व नंतर पोलाद, मार्ग परिवहन आणि महामार्ग राज्यमंत्री होते. 2011-12 पर्यंत पेट्रोलियम आणि 2012- 14 पर्यंत मनुष्यबळ विकास राज्यमंत्री होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. काही महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती.