Pre-Poll Survey 2021: राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत, ही तर 'या' राज्याची इच्छा; सर्व्हेत मोदींना टाकलं मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 08:48 AM2021-03-09T08:48:54+5:302021-03-09T08:51:01+5:30
Kerala Pre Poll survey: ५५ टक्क्यांहून अधिक लोकांची राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून पसंती; मोदींना जवळपास ३२ टक्के लोकांची पसंती
नवी दिल्ली: देशात लवकरच पाच राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठीच्या प्रचारसभांना सुरुवात झाली आहे. सत्ताधारी, विरोधकांनी कंबर कसली आहे. मतदान होण्यापूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचे आकडेदेखील समोर आले होते. त्यानुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या अध्यक्षा आणि विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सत्ता राखताना दिसत आहेत. तर आसाममध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं सरकार येऊ शकतं.
पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या कामावर बहुतांश राज्यांतील जनतेनं समाधान व्यक्त केलं आहे. मात्र टाईम्स नाऊ आणि सी-व्होटरनं केरळमध्ये केलेल्या सर्वेक्षणात काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना मागे टाकलं आहे. पंतप्रधान पदासाठी कोणाला पसंती द्याल, असा प्रश्न सर्वेक्षणात सहभागी झालेल्या केरळमधील रहिवाशांना विचारण्यात आला. त्यावर ५५.८४ टक्के लोकांनी राहुल गांधी असं उत्तर दिलं. तर नरेंद्र मोदींच्या नावाला पसंती देणाऱ्यांचं प्रमाण ३१.९५ टक्के इतकं होतं.
केरळमध्ये डावे, आसामात भाजपा, तर बंगालमध्ये असा असेल मतदारांचा कल
केरळमध्ये अब की बार, कोणाचं सरकार?
केरळमध्ये डावे आणि काँग्रेस आलटून पालटून सत्तेत असतात. यंदा मात्र केरळमध्ये सत्तेत असलेले डावे पुन्हा सरकार स्थापन करतील, असा अंदाज टाईम्स नाऊ-सी व्होटर यांनी सर्वेक्षणातून व्यक्त केला आहे. केरळमध्ये विधानसभेचे एकूण १४० मतदारसंघ आहेत. यापैकी ८२ जागांवर लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (एलडीएफ) विजयी होईल. तर काँग्रेसप्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला (यूडीएफ) ५६ जागा मिळू शकतात. राज्यात भाजपला केवळ १ जागा मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सत्तापालट नाहीच; यूडीएफला ६० पर्यंत जागा मिळण्याचा अंदाज
टाईम्स नाऊ-सी व्होटरनं केलेल्या मतदानपूर्व सर्वेक्षणात एलडीएफ सत्ता राखेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एलडीएफला ७८ ते ८६ जागा मिळू शकतात. केरळमध्ये बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ७१ आमदारांचा पाठिंबा आहे. सध्या विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसप्रणित यूडीएफला विरोधी बाकांवरच बसावं लागण्याची शक्यता आहे. त्यांना ५२ ते ६० जागा मिळतील असा अंदाज आहे. तर भाजपला ० ते २ आणि इतरांना ० ते २ जागांवर समाधान मानावं लागू शकतं.