काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 14:08 IST2024-09-28T14:04:57+5:302024-09-28T14:08:29+5:30
हरियाणात पक्षातील गटबाजी रोखताना काँग्रेसच्या नाकीनऊ आल्याचे दिसत आहे. काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला, या कार्यक्रमातील कुमारी शैलजा आणि रणदीप सुजरेवालांची अनुपस्थितीने चर्चेला तोंड फुटले आहे.

काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
Congress Politics News : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आता तोंडावर आले आहे. अशात काँग्रेसमधील गटबाजी अजूनही मिटली नसल्याचे दिसत आहे. काँग्रेसने शनिवारी (28 सप्टेंबर) जाहीरनामा प्रसिद्ध केला. अनेक मोठ्या घोषणा काँग्रेसने केल्या आहेत. पण, जाहीरनाम्यातील घोषणांबरोबर चर्चा सुरू झाली आहे, ती खासदार कुमारी शैलजा आणि रणदीप सुरजेवाला यांच्या अनुपस्थितीची. दोन दिवसांपूर्वी राहुल गांधींच्या प्रचारसभेत पक्षात एकजूट असल्याचा संदेश दिला गेला, पण २ दिवसांतच त्याला छेड दिला गेला आहे.
ना शैलजा-सुरजेवाला, ना त्यांचे समर्थक नेते
काँग्रेसने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. या कार्यक्रमाला काँग्रेसचे हरियाणा प्रदेशाध्यक्ष उदय भान, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.
पण, जाहीरनामा प्रसिद्धी कार्यक्रमाला खासदार कुमारी शैलजा आणि रणदीप सुरजेवाला उपस्थित नसल्याची गोष्ट उमटून आली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शैलजा आणि सुरजेवाला यांच्या गटातील कोणताही नेता काय कार्यक्रमाला हजर राहिला नाही. त्यामुळेच काँग्रेसमधील गटागटातील शीतयुद्ध मिटले नसल्याचे अधोरेखित झाले आहे.
कुमारी शैलजा नाराज
खासदार कुमारी शैलजा यांची नाराजी लपून राहिलेली नाही. त्या काँग्रेसच्या प्रचारातही फारशा दिसलेल्या नाहीत. दोन दिवसांपूर्वी म्हणजे २६ सप्टेंबर रोजी राहुल गांधी यांची प्रचारसभा झाली. त्यावेळी कुमारी शैलजा व्यासपीठावर दिसल्या.
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने हरियाणा काँग्रेसमध्ये भूपेंद्र हुड्डा गट जास्त ताकदवान झाला आहे. तिकीट वाटपावेळी कुमारी शैलजा आणि रणदीप सुरजेवाला यांच्या समर्थकांना डावलण्यात आले. त्याचबरोबर कुमारी शैलजांबद्दल हुड्डा गटाकडून अपमानजनक विधाने केली गेली. त्यामुळे शैलजा या नाराज आहेत. तर सुरजेवालाही समर्थकांना तिकीट वाटपात डावललं गेल्याने नाराज आहे. शैलजा आणि सुरजेवाला प्रचारापासून दूर आहेत.