'त्याचे' वडील होते राजीव गांधींचे 'खास'; पण तो उतरतोय राहुलविरोधात मैदानात!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 10:37 AM2019-03-26T10:37:51+5:302019-03-26T10:39:43+5:30
अमेठीत राहुल गांधींना मोहम्मद हारुन रशिद देणार आव्हान
अमेठी: काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते मोहम्मद हारुन रशिद यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधींविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. रशिद यांचं कुटुंब पिढ्यानपिढ्यांपासून काँग्रेसचं कट्टर समर्थक असल्यानं अमेठीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राहुल गांधींविरोधात शड्डू ठोकणारे रशिद काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींचे निकटवर्तीय मानले जातात. अमेठीचा पुरेसा विकास न झाल्याचा दावा करत रशिद यांनी निवडणुकीच्या रिंगणात राहुल यांना आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.
मोहम्मद हारुन रशिद यांचे वडील मोहम्मद सुलतान राहुल गांधींचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधींचे अतिशय विश्वासू सहकारी होते. त्यामुळेच रशिद यांनी राहुल गांधींविरोधात दंड थोपटल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. राहुल यांच्या आधी राजीव गांधी आणि सोनिया गांधींनी अमेठीतून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांच्या उमेदवारी अर्जांवर हारुन यांचे वडील सुलतान यांनी स्वाक्षरी केल्या होत्या.
राहुल गांधींच्या काळात अमेठीचा विकास न झाल्याचा आरोप रशिद यांनी केला. 'काँग्रेसच्या कथनी आणि करनीमध्ये मोठा फरक आहे. याचं मूर्तीमंत उदाहरण अमेठीत पाहायला मिळतं. अमेठीत कोणीही आलं, तरी लगेचच त्यांना या भागातील परिस्थितीत लक्षात येईल. अमेठीत विकासकामं झालेली नाहीत. अमेठीतील जनतेला चांगलं भविष्य मिळावं यासाठी मी निवडणूक लढवतो आहे,' असं रशिद यांनी सांगितलं.
हारुन यांचे वडील सुलतान काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते होते. '1910 मध्ये माझ्या वडिलांचा जन्म झाला. तरुण असतानाच त्यांनी काँग्रेसमध्ये काम करण्यास सुरुवात केली. आमचं कुटुंब 70 वर्षांपासून काँग्रेससाठी कार्यरत आहे. मात्र पक्ष अमेठीसाठी काहीच करत नाही, ही गोष्ट आता माझ्या लक्षात आली आहे. आम्ही आता जागे झालो नाही, तर अमेठीचं भविष्य बदलणार नाही,' असं रशिद म्हणाले.