'काँग्रेसची मालक जनता, तर भाजपाचे मालक अनिल अंबानी'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 02:50 PM2019-05-03T14:50:33+5:302019-05-03T14:53:04+5:30
राहुल गांधींचा भाजपावर निशाणा
अमेठी: लोकसभा निवडणुकीचं पाचव्या टप्प्यातलं मतदान जवळ आलं असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी अमेठीवासीयांना पत्र लिहिलं आहे. अमेठी माझं कुटुंब आहे. त्यामुळे अमेठीशी माझं भावनिक नातं आहे. एखाद्या कुटुंबातील सदस्यांचं जसं एकमेकांशी नातं असतं, तसंच नातं माझं आणि अमेठीतल्या जनतेचं असल्याचं राहुल यांनी पत्रात म्हटलं आहे. भाजपाकडून असत्याचा प्रचार केला जात असून केवळ पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं टीकास्त्र राहुल यांनी सोडलं.
अमेठीवासीयांना लिहिलेल्या पत्रात राहुल गांधींनी अप्रत्यक्षपणे राफेलचा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेसची मालक जनता आहे. तर भाजपाचे मालक अनिल अंबानी आहेत, अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी राफेलचा प्रत्यक्ष उल्लेख न करता भाजपावर शरसंधान साधलं. 'काँग्रेस पक्ष गरीब, महिला, छोट्या दुकानदारांसाठी काम करू इच्छितो. पण भाजपाला केवळ 15 ते 20 उद्योगपतींना सरकारचं मालक करायचं आहे. देशात काँग्रेसचं सरकार येताच अमेठीतली थांबलेली विकासकामं पुन्हा सुरू होतील,' असं राहुल यांनी पत्रात म्हटलं आहे.
अमेठी से कांग्रेस अध्यक्ष राहुल गाँधी का रिश्ता भावनात्मक तौर पर उतना ही मजबूत है, जितना परिवार के सदस्यों के बीच होता है। कांग्रेस अध्यक्ष @RahulGandhi का अपने अमेठी परिवार की जनता के नाम विनम्र सन्देश:- pic.twitter.com/9L6zYt40Al
— Congress (@INCIndia) May 3, 2019
राहुल यांनी त्यांच्या पत्रातून अमेठीवासींयाना भावनिक साद घातली. 'अमेठी माझं कुटुंब आहे. माझं कुटुंब मला धैर्य देतं. त्याचमुळे मी सत्याच्या बाजूनं उभा आहे. गरीबांच्या व्यथा ऐकतो आहे. त्यांच्यासाठी आवाज उठवतो आहे. तुम्ही मला प्रेमाची शिकवण दिली आहे. त्यामुळेच मी देशाला जोडण्याचा प्रयत्न करत आहे,' असं राहुल यांनी पत्रात म्हटलं आहे. या पत्रातून त्यांनी भाजपावर तोंडसुख घेतलं आहे. 'भाजपाची मंडळी निवडणुकीवेळी खोटारडेपणाचा कारखाना सुरू करतात. पैशांच्या नद्या वाहतात. पण त्यांना अमेठीच्या ताकदीची कल्पना नाही. खरेपणा, स्वाभिमान आणि साधेपणा हेच अमेठीवासीयांचं सामर्थ्य आहे,' अशा शब्दांमध्ये राहुल यांनी सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधलं आहे.