काँग्रेसचा हात देशासोबत की देशद्रोह्यांसोबत?; पंतप्रधान मोदींचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 01:00 PM2019-04-03T13:00:28+5:302019-04-03T13:00:33+5:30
कलम 124-अ रद्द करण्याच्या आश्वासनावरुन काँग्रेसवर हल्लाबोल
इटानगर: सत्तेत आल्यास देशद्रोहाचं कलम रद्द करण्याचं आश्वासन देणाऱ्या काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निशाणा साधला आहे. देशातील फुटिरतावाद्यांना प्रोत्साहन देण्याचा काँग्रेसचा मानस आहे. तिरंगा जाळणाऱ्या, जय हिंदऐवजी भारत तेरे तुकडे होंगे अशा घोषणा देणाऱ्यांबद्दल काँग्रेसला सहानुभूती वाटते. त्यामुळेच काँग्रेसचा हात देशासोबत आहे की देशद्रोह्यांसोबत, असा प्रश्न विचारावासा वाटतो, असं मोदींनी म्हटलं. यावेळी त्यांना महाआघाडीच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्याचं आवाहन उपस्थितांना केलं. ते अरुणाचल प्रदेशात आयोजित करण्यात आलेल्या एका जनसभेत बोलत होते.
काल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. सत्तेत आल्यास भारतीय दंड संहितेतलं देशद्रोहाचं कलम (124-अ) रद्द करण्याचं वचन काँग्रेसनं जाहीरनाम्यातून दिलं. त्यावरुन मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. 'आम्ही देशद्रोह्यांना कठोर शिक्षा देण्याची भूमिका मांडतो. मात्र काँग्रेसला हे कलमच रद्द करायचं आहे. त्यामुळे काँग्रेसचा हात नेमका कोणासोबत आहे? देशासोबत की देशद्रोह्यांसोबत?', असा सवाल मोदींनी विचारला.
यावेळी मोदींनी गेल्या 5 वर्षांत झालेल्या विकासकामांची माहिती दिली. 'आम्ही गॅस देण्याचं आश्वासन दिलं नव्हतं. मात्र उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत 7 कोटींहून अधिक सिलिंडर दिले. आम्ही आरोग्या क्षेत्रासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या नव्हत्या. मात्र आयुष्यमान भारत योजना लागू केली. त्यातून गरिबांना मोफत उपचार मिळत आहेत,' असं मोदींनी म्हटलं. मी जे काम हाती घेतो, ते पूर्ण करतोच, असंदेखील पंतप्रधान म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर जोरदार टीका केली. काँग्रेसचा जाहीरनामा खोट्या आश्वासनांनी भरलेला आहे, असं मोदींनी म्हटलं.