वाराणसीत मोदी विरुद्ध गांधी? प्रियंका निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 04:24 PM2019-04-13T16:24:26+5:302019-04-13T16:24:58+5:30
प्रियंका गांधी वाराणसीतून पंतप्रधान मोदींना आव्हान देण्याची शक्यता
नवी दिल्ली: काँग्रेसच्या महासचिव आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाच्या प्रभारी प्रियंका गांधीवाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढवू शकतात. 'इंडिया टुडे'नं सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. प्रियंका गांधींनी आपण निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना सांगितलं आहे. यावर अंतिम निर्णय राहुल गांधी आणि सोनिया गांधी घेणार आहेत.
महासचिवपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. राज्याच्या विविध भागांमध्ये त्यांचे प्रचार दौरे सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी मोदींविरोधात वाराणसीतून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीनं महाआघाडीत काँग्रेसला स्थान दिलेलं नाही. त्यांनी काँग्रेसला दोन जागा (अमेठी आणि रायबरेली) सोडल्या आहेत. महाआघाडीत स्थान न मिळाल्यानं काँग्रेसनं प्रियंका यांना राजकारणात उतरवलं. त्याआधी त्या सक्रीय राजकारणात नव्हत्या.
प्रियंका यांनी महासचिवपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर बनारसचा दौरा केला. त्यांनी काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी शहिदांच्या कुटुंबांची भेट घेतली. यानंतर प्रियंका गांधी निवडणूक लढणार का, अशी चर्चा सुरू झाली. गेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी वाराणसीत आव्हान दिलं होतं. या निवडणुकीत मोदींना 3 लाख 71 हजार 784 मतांनी विजय मिळवला. केजरीवाल यांना 2 लाख 9 हजार 238, तर मोदींना 5 लाख 81 हजार 22 मतं मिळाली होती.