'न्याय' देण्यासाठी 72 हजार आणणार कुठून?; राहुल गांधींनी दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 01:09 PM2019-04-05T13:09:03+5:302019-04-05T13:09:11+5:30
न्याय योजनेबद्दल विद्यार्थ्यानं विचारलेल्या प्रश्नाला राहुल गांधींचं उत्तर
पुणे: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी तरुण मतदारांशी संवाद साधला. यावेळी राहुल यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वीच न्याय योजनेची घोषणा केली. मात्र त्यासाठी निधी कुठून आणणार, याचं उत्तर त्यावेळी राहुल यांनी दिलं नव्हतं. त्याबद्दल राहुल यांनी आज भाष्य केलं.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबांना दर वर्षी 72 हजारांची रक्कम दिली जाईल, असं आश्वासन राहुल गांधींनी दिलं आहे. या योजनेसाठी पैसा कुठून आणणार, असा प्रश्न त्यांना एका विद्यार्थ्यानं विचारला. यावर आम्ही नीरव मोदी, अनिल अंबानी, मेहुल चोकसी आणि विजय माल्ल्याकडून पैसे आणून गरिबांना देऊ, असं उत्तर काँग्रेस अध्यक्षांनी दिलं. 'किमान मासिक उत्पन्न 12 हजारांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबांना वर्षाकाठी 72 हजारांची आर्थिक मदत दिली जाईल. याचा फायदा देशातील 20 टक्के जनतेला होईल,' असा दावा राहुल यांनी केला होता. या योजनेला काँग्रेसला न्याय (न्यूनतम आय योजना) असं नाव दिलं आहे.
राहुल गांधींनी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना न्याय योजनेचा पुनरुच्चार केला. मात्र या योजनेसाठी पैसा कुठून आणला जाणार, हा प्रश्न अनुत्तरितच होता. आज विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. 'नीरव मोदी, मेहुल चोकसी, अनिल अंबानी आणि विजय माल्ल्यासारख्या लोकांकडून पैसा घेऊन आम्ही तो लोकांना देऊ. त्यासाठी मध्यम वर्गावरील कराचा बोजा वाढवणार नाही,' असं राहुल म्हणाले. 'आम्ही या योजनेसाठी आवश्यक तो अभ्यास केलेला आहे. कुठून पैसा आणायचा, तो कोणाला द्यायचा, याचा अभ्यास करण्यात झालेला आहे. आधी प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवण्यात येईल. त्यानंतर देशभरात तिची अंमलबजावणी केली जाईल,' असं त्यांनी सांगितलं.