त्रिशंकू परिस्थितीसाठी विरोधक सज्ज; राष्ट्रपतींना पाठवणार पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 08:26 PM2019-05-22T20:26:19+5:302019-05-22T20:28:18+5:30
कर्नाटकची पुनरावृत्ती करण्याचा विरोधकांचा प्रयत्न
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीचा निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. भाजपानं काल एनडीएतील घटक पक्षांना डिनर पार्टी दिल्यानंतर विरोधकांच्या हालचाली वाढल्या आहेत. भाजपा बहुमतापर्यंत न पोहोचल्यास आणि त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास राष्ट्रपतींना पत्र देण्याची योजना विरोधकांनी आखली आहे. गेल्या वर्षी कर्नाटकमध्ये यशस्वी झालेली रणनीती पुन्हा एकदा विरोधकांकडून वापरली जाण्याची शक्यता आहे.
भाजपाला स्वबळावर सत्ता न मिळाल्यास विरोधी पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास बिगर भाजपा सरकार स्थापण्याचा दृष्टीनं विरोधकांची तयारी सुरू आहे. येत्या दोन दिवसात त्याबद्दल राष्ट्रपतींना तसं पत्र देण्याची योजना विरोधकांकडून आखण्यात आली आहे. यासाठी गेल्या आठवडाभरापासून विरोधकांचं बैठकांचं सत्र सुरू आहे. टीपीपीचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी विरोधी पक्षातील भेटीगाठी घेण्याचा सपाटा लावला आहे. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही फोनाफोनी सुरू आहे.
त्याआधी गेल्याच आठवड्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे खजिनदार अहमद पटेल आणि वरिष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालादिवशीची रणनीती या बैठकीत ठरवण्यात आली. या बैठकीतील चर्चेनंतर पक्षाच्या कायदेविषयक विभागानं एक मसुदा तयार केला. बिगर एनडीए सरकार स्थापन करण्यासाठी विविध पक्ष आपला पाठिंबा कसा देऊ शकतात, याची माहिती या मसुद्यात आहे.
त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास आम्हाला बहुमत सिद्ध करण्याची संधी द्या, अशी मागणी राष्ट्रपतींकडे करण्यात येईल, असं काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलं. एनडीए बहुमतापासून दूर राहिल्यास आम्ही कर्नाटक पॅटर्नची पुनरावृत्ती करू. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींच्या संमतीनं हा निर्णय घेतला जाईल, अशी माहितीदेखील या नेत्यानं दिली. कर्नाटकमध्ये गेल्या वर्षी विधानसभेची निवडणूक झाली. त्यात भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या. मात्र दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसनं तिसऱ्या क्रमांकावरील जनता दलाच्या (सेक्युलर) साथीनं सरकार स्थापन केलं.