नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर होऊ देणार नाही- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 05:41 PM2019-04-03T17:41:46+5:302019-04-03T17:46:18+5:30
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या आसाममध्ये सभा घेत आहेत. यावेळी त्यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या आडून भाजपावर निशाणा साधला आहे.
आसामः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या आसाममध्ये सभा घेत आहेत. यावेळी त्यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या आडून भाजपावर निशाणा साधला आहे. गोलाघाटमध्ये एका रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, नागरिकत्व विधेयक कधीही मंजूर होऊ देणार नाही. न्याय योजनेवरून मोदींनी केलेल्या टीकेलाही राहुल गांधींनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
न्याय योजनेसाठी त्या चोरांच्या खिशातूनच पैसे येणार आहेत, ज्यांना मोदी वाचवत आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत ईशान्य भारतावर हल्ला होऊ देणार नाही. एकीकडे प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचं मोदी सरकारनं खोटं आश्वासन दिलं, तर दुसरीकडे काँग्रेस पार्टीनं तुम्हाला 72 हजार रुपये देण्याचं खरं आश्वासन दिलं आहे. भारतातल्या 20 टक्के गरीब लोकांच्या खात्यात काँग्रेस पाच वर्षांत 3 लाख 60 हजार रुपये खात्रीशीररीत्या जमा करणार आहे. मोदींनी पाच वर्षांत कोट्यवधी लोकांना बेरोजगार केलं आहे.
Rahul Gandhi in Bokakhat: Ek taraf chowkidar ka jhuut, har bank account mein 15 lakh rupay, dusri taraf Congress party ka sach, Hindustan ke 20% sabse gareeb logon ko Congress party 5 saal mein 3 lakh 60 hazaar rupay guarantee karke bank account mein daal ke de degi. #Assampic.twitter.com/1J1X1wJmGA
— ANI (@ANI) April 3, 2019
सत्तेत येण्यापूर्वी मोदींनी मोठ-मोठी आश्वासनं दिली होती. परंतु त्यातील कोणतंही आश्वासन मोदींनी पूर्ण केलेलं आहे काय?, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करण्याच्या आश्वासनाची अद्यापही पूर्ती केलेली नाही. आमचं सरकार सत्तेवर आल्यास महिन्याकाठी 12 हजारांहून कमी उत्पन्न असलेल्या लोकांची एक यादी तयार केली जाईल, त्या सर्वांच्या खात्यात काँग्रेस सरकार 72 हजार जमा करणार आहे. देशातील लाखो तरुण व्यवसाय सुरू करू इच्छितात. परंतु त्यासाठी सद्यस्थितीतील सरकारकडून परवानगी घ्यावी लागते. परंतु आमचं सरकार आल्यावर कोणालाही व्यवसाय करायचा असल्यास परवानगी घेण्याची गरज लागणार नाही.