सॅम पित्रोडांना 'त्या' विधानाबद्दल लाज वाटायला हवी- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 05:50 PM2019-05-13T17:50:54+5:302019-05-13T17:52:24+5:30
पित्रोडांनी जाहीर माफी मागायला हवी; राहुल गांधींनी टोचले कान
फतेहगड: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या शीखविरोधी दंगलीवरुन काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. काँग्रेस नेते सॅम पित्रोडांच्या वादग्रस्त विधानामुळे काँग्रेसला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला आहे. शीखविरोधी दंगलीबद्दल केलेल्या विधानाची सॅम पित्रोडांना लाज वाटायला हवी, अशा शब्दांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पित्रोडांचे कान टोचले आहेत. पित्रोडांनी त्यांच्या विधानाबद्दल माफी मागायला हवी, असंदेखील गांधी म्हणाले. ते पंजाबमधल्या फतेहगडमध्ये जनसभेला संबोधित करत होते.
'1984 मध्ये झालेल्या दंगलीबद्दल पित्रोडा जे काही बोलले, ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्यासाठी त्यांनी देशाची माफी मागायला हवी. ते जे काही बोलले, ते अत्यंत चुकीचं होतं हे मी त्यांना फोनवर सांगितलं आहे. त्यांना या विधानाबद्दल लाज वाटायला हवी आणि या प्रकरणी त्यांनी जाहीर माफी मागायला हवी,' असं राहुल गांधी म्हणाले. पित्रोडा यांना शुक्रवारी 1984 मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर जे झालं ते झालं, असं उत्तर पित्रोडांनी दिलं.
सॅम पित्रोडांच्या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाच्या सर्वच नेत्यांनी जोरदार टीका केली. पित्रोडांच्या विधानातून काँग्रेसचा अहंकार आणि चारित्र्य दिसतं, अशा शब्दांत मोदींनी पित्रोडांच्या विधानाचा समाचार घेतला. 'काँग्रेसचे वरिष्ठ नेते 1984 मध्ये दंगल झाली तर झाली असं म्हणतात. हे नेते कोण आहेत तुम्हाला माहीत आहे का? ते गांधी कुटुंबाच्या अत्यंत जवळचे आहेत. ते राजीव गांधींचे खूप चांगले मित्र होते आणि काँग्रेसच्या नामदार अध्यक्षांचे गुरू आहेत,' अशी घणाघाती टीका मोदींनी शुक्रवारी रोहतकमधल्या जनसभेत केली होती.