लोकसभा निवडणूक : यादी पाहिली आणि राहुल गांधी संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 05:02 PM2019-02-28T17:02:26+5:302019-02-28T17:03:40+5:30
गांधी यांनी स्वत:च्या सुत्रांकडून राज्याच्या काही लोकसभा मतदारसंघातील संभाव्य नावे तयार केली आहेत. प्रदेश शाखेकडून आलेल्या नावांमध्ये त्यांच्याकडची नावे नसल्याने त्यांनी खर्गे यांच्याकडे त्याबाबत विचारणा केली.
राजू इनामदार
पुणे:लोकसभेच्या राज्यातील मतदारसंघासाठी छाननी समितीने तयार केलेल्या यादीवरून काँग्रेस पक्षाध्यक्ष राहूल गांधी संतप्त झाले असल्याची चर्चा आहे. त्यांनी समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पक्षाच्या राज्यातील ज्येष्ठ नेत्यांबरोबर तसेच त्या-त्या मतदारसंघातील पदाधिकाºयांबरोबर थेट संपर्क करून नवी यादी तयार करण्याचे आदेश दिले असल्याचे समजते. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडेही राहूल गांधी यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती पक्षातील विश्वसनीय सुत्रांनी दिली. पुणे, यवतमाळ, सांगली अशा काही लोकसभा मतदारसंघांचा यात समावेश असल्याची चर्चा आहे.
दिल्लीत सोमवारी राज्याच्या छाननी समितीची बैठक झाली. समिती सदस्य म्हणून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राज्य विधीमंडळ पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे या बैठकीला उपस्थित होते. खर्गे समितीचे अध्यक्ष व पक्षाने नियुक्त केलेले महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. त्या बैठकीत प्रदेश शाखेकडून आलेल्या नावांवर चर्चा झाली. त्यात राजीव सातव, सुशिलकुमार शिंदे, चारूशिला टोकस ही नावे त्यांंच्या मतदारसंघातून एकमेव असल्यामुळे ती केंद्रीय निवड समितीकडे पाठवण्यासाठी निश्चित झाली, पुणे, अहमदनगर (दक्षिण),यवतमाळ, मुंबई अशा काही मतदारसंघातून एकापेक्षा जास्त नावे आहेत. त्या जागांसाठी केंद्रीय संसदीय समितीकडे दिलेल्या नावांवरून राहूल गांधी संतप्त झाले असल्याचे बोलले जात आहे.
गांधी यांनी स्वत:च्या सुत्रांकडून राज्याच्या काही लोकसभा मतदारसंघातील संभाव्य नावे तयार केली आहेत. प्रदेश शाखेकडून आलेल्या नावांमध्ये त्यांच्याकडची नावे नसल्याने त्यांनी खर्गे यांच्याकडे त्याबाबत विचारणा केली. प्रदेश शाखने निश्चित केलेली नावेच यादीत आहेत असे खर्गे यांनी त्यांना सांगितले.त्यावेळी गांधी यांनी त्यांच्याकडे असलेल्या काही नावांचा उल्लेख करत प्रदेश शाखेच्या यादीत ही नावे का नाहीत अशी विचारणा केली असल्याची माहिती मिळाली. उल्हास पवार यांच्या पत्राचाही संदर्भ त्यांनी दिला असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले. राज्य शाखेबरोबर पुन्हा बोला, स्थानिक पदाधिकाºयांशी चर्चा करा, त्यानंतर नवी यादी तयार करा असा आदेश राहूल यांनी खर्गेंना दिला. येत्या आठ दिवसांमध्ये ही सर्व प्रक्रिया करण्याबाबत त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे पुण्यासह राज्याच्या यादीत काही बदल होण्याची शक्यता वाढली आहे. पुण्यातील इच्छुक उमेदवारांच्या आशाही त्यामुले पल्लवीत झाल्या आहेत.