MP Crisis: काँग्रेसचे आणखी काही आमदार भाजपाच्या संपर्कात; पोटनिवडणुकीनंतर सोडणार साथ
By प्रविण मरगळे | Published: October 28, 2020 09:25 AM2020-10-28T09:25:58+5:302020-10-28T09:28:09+5:30
Madhya Pradesh, Congress, BJP Mla News: पुढील काही दिवसांत या आमदारांची नावेही समोर येऊ शकतात, तर कॉंग्रेस लोकशाहीची हत्या करत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
भोपाळ - मध्य प्रदेशच्या राजकारणात गेल्या ७ महिन्यांत अनेक काँग्रेसआमदारांनी पक्षाला रामराम करत भाजपाची वाट धरली. आतापर्यंत २६ आमदारांनीकाँग्रेसचा हात सोडून भाजपाला साथ दिली. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात काँग्रेसचं सरकार कोसळलं आणि भाजपाला सत्तास्थापन करण्यात यश आलं. आता आणखी काही आमदारांच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपाने केला आहे.
पुढील काही दिवसांत या आमदारांची नावेही समोर येऊ शकतात, तर कॉंग्रेस लोकशाहीची हत्या करत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. पोटनिवडणुकीदरम्यान कॉंग्रेसचे आणखी एक आमदार भाजपामध्ये दाखल झाल्यानंतर अजून काही आमदार संपर्कात आहेत, असा भाजपा नेत्यांचा दावा आहे. अशा परिस्थितीत पोटनिवडणुकीच्या निकालाच्या आधी कॉंग्रेसला आणखी अडचणींचा सामना करावा लागणार आहे काय असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
भाजपा नेते पंकज चतुर्वेदी म्हणाले की, भाजपामध्ये सामील झालेल्या नेत्यांचे स्वागत आहे. आमदारांच्या प्रवेशामुळे कॉंग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. इतर अनेक कॉंग्रेसचे आमदार संपर्कात आहेत. विधानसभेच्या २७ जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर आमदारांचा पाठिंबा व राजीनामा बंद होईल असा विश्वास व्यक्त केला जात होता, परंतु अद्याप ते सुरूच आहे. पहिल्यांदा भगवानपुरा येथील अपक्ष आमदार केदार चिदाभाई डावार यांनी शिवराज सरकारला पाठिंबा जाहीर केला आणि आता कॉंग्रेसचे आमदार राहुलसिंग लोधी यांनी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. कॉंग्रेस सतत भाजपावर घोडेबाजाराचा आरोप करत आहे. जर भाजपला अशा पद्धतीने आमदारांना विकत घ्यायचे असेल तर पोटनिवडणुका का घेत आहेत असा सवाल कॉंग्रेस नेते जेपी धनोपिया यांनी केला आहे.
दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे गटाच्या तुलसी सिलावट आणि गोविंद राजपूत यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. सभागृहाचे सदस्यत्व नसतानाही मंत्रिपदाच्या कार्यकाळाचे सहा महिने पूर्ण झाल्याने या दोन्ही मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारून ते राज्यपालांकडे पाठवले आहेत. तुलसी सिलावट आणि गोविंद राजपूत हे ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये दाखल झाले होते. तसेच ते पोटनिवडणुकही लढवत आहेत.
मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्या २२ समर्थक आमदारांनी राजीनामा दिल्याने मार्च महिन्यात कमलनाथ सरकार कोसळले होते. तर भाजपाच्या दोन आमदारांचं निधन झाल्याने दोन जागा रिक्त झाल्या आहेत. तर अजून तीन आमदारांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपाचे सदस्यत्व स्वीकारला होते. त्यामुळे रिक्त झालेल्या एकूण २७ मतदारसंघांमध्ये ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे.