Kapil Sibal : पिक्चर अभी बाकी है! काँग्रेसमधील घमासान सुरू; कपिल सिब्बल यांचं सौम्य, पण सूचक ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 12:06 PM2020-08-25T12:06:54+5:302020-08-25T13:03:50+5:30
Kapil Sibal Tweets: काँग्रेसमधील कुरबुरी संपेना; काल ट्विट डिलीट करणाऱ्या कपिल सिब्बल यांचं आज सूचक ट्विट
नवी दिल्ली: सलग दोन लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागणाऱ्या काँग्रेसच्या अडचणी कायम आहेत. सोनिया गांधी हंगामी अध्यक्षपदी कायम आहेत. सोनिया गांधी रुग्णालयात असताना नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलेलं पत्र लिहिण्यात आल्यानं राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी थेट राहुल गांधींचं नाव घेऊन टीका केली. मात्र अवघ्या काही मिनिटांत त्यांनी ट्विट डिलीट केलं. मात्र आता पुन्हा कपिल सिब्बल यांनी सूचक ट्विट केलं आहे.
गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल यांच्यासह २३ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिलं. पक्ष संघटनेत बदल करण्यात यावे, पूर्ण वेळ आणि प्रभावी नेतृत्त्व मिळावं अशा मागण्या पत्रातून करण्यात आल्या. या पत्रावरून काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत घमासान झालं. राहुल यांनी पत्र लिहिणाऱ्या नेत्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. यानंतर कपिल सिब्बल यांनी थेट राहुल यांचं नाव घेत ट्विट केलं. मात्र त्यानंतर त्यांनी ट्विट मागे घेतलं.
आज पुन्हा कपिल सिब्बल यांनी एक ट्विट केलं आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये महाभारत सुरुच असल्याचं दिसत आहे. 'ही कोणाच्याही पदाची गोष्ट आहे. ही माझ्या देशाची बाब आहे, जी सर्वाधिक गरजेची आहे,' असं सिब्बल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. सिब्बल यांच्या ट्विटवरून ते बंड करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल राहुल गांधीविरोधात अतिशय आक्रमकपणे ट्विट करणाऱ्या सिब्बल यांनी आज वापरलेली भाषा अतिशय सौम्य पण सूचक आहे.
It’s not about a post
— Kapil Sibal (@KapilSibal) August 25, 2020
It’s about my country which matters most
संजय झा यांचा काँग्रेसवर निशाणा
काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या संजय झा यांनीदेखील भाष्य केलं आहे. ही अंताची सुरुवात आहे, अशा शब्दांत झा यांनी काँग्रेसमधील घडामोडींवर निशाणा साधला आहे. झा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये काँग्रेसचा कुठेही उल्लेख नाही. मात्र त्यांचं ट्विट काँग्रेसमधील कुरबुरींवर असल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या १०० हून अधिक नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिल्याचं संजय झा यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. मात्र त्यांचा दावा काँग्रेसनं खोडून काढला होता.
This is just the end of the beginning.
— Sanjay Jha (@JhaSanjay) August 25, 2020
सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय?
देशभरातील काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षात मोठ्या बदलांची गरज असल्याचं मत त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष गरजेचा असल्याची महत्त्वाची मागणी २३ नेत्यांनी पत्रातून केली. यामध्ये काँग्रेस कार्यसमितीच्या अनेक सदस्यांसह, पाच माजी मुख्यमंत्री, खासदार आणि माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. पक्ष जनाधार आणि तरुणांचा विश्वास गमावत आहे. पक्षाला प्रभावी नेतृत्त्वाची गरज आहे. तो केवळ काम करताना दिसू नये, तर त्याचं काम प्रत्यक्ष जमिनीवर दिसायला हवं. सीडब्ल्यूसीची निवडणूक व्हायला हवी आणि पक्षाला पुन्हा उभारी घ्यावी यासाठी ठोस योजना तयार करायला हवी, असं २३ नेत्यांनी पत्रात म्हटलं आहे.
काँग्रेस नेत्यांनी मांडलेल्या अडचणी-
१. राज्य काँग्रेसचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तांमध्ये नाहक विलंब.
२. सन्मान आणि स्वीकारार्ह असलेल्या नेत्यांच्या प्रदेश काँग्रेसवर नियुक्त्या होत नाहीत.
३. राज्य प्रमुखांना संघटनेशी संबंधित निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही.
४. युथ काँग्रेस आणि एनएसयूआयमधील निवडणुकांमुळे संतुलन बिघडलं.
काँग्रेस नेत्यांच्या मागण्या काय?
१. नेतृत्वात स्थायी आणि प्रभावी बदल व्हावेत.
२. काँग्रेस कार्यकारी समितीच्या निवडणूक व्हाव्यात
३. पक्षानं गमावलेली ताकद परत मिळवण्यासाठी योजना गरजेची
४. संघटनेतील प्रत्येक स्तरावर निवडणूक व्हावी
५. संसदीय पार्टी बोर्डाची स्थापना व्हावी.
६. प्रदेश काँग्रेसला ताकद दिली जावी.
पत्रावर कोणाच्या स्वाक्षऱ्या?
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाम, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, शशी थरूर, खासदार विवेक तनखा, AICC आणि CWC चे मुकुल वासनिक आणि जितिन प्रसाद, माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, राजेंद्र कौर भटट्ल, वीरप्पा मोइली, पृथ्वीराज चव्हाण, पी. जे. कुरियन, अजय सिंह, रेणुका चौधरी आणि मिलिंद देवरा, प्रदेशाध्यक्ष सांभाळण्याचा अनुभव असलेले राज बब्बर, अरविंदर सिंह लवली, कौल सिंह यांच्यासह अखिलेश प्रसाद सिंह, कुलदीप शर्मा, योगानंद शास्त्री आणि संदीप दीक्षित.
'ते' दोन शब्द राहुल गांधींना लागले; वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप केले
कपिल सिब्बल राहुल गांधींवर भडकले; कडक शब्दांत ट्वीट करत सुनावले
राहुल गांधीविरोधातलं 'ते' आक्रमक ट्विट सिब्बल यांच्याकडून काही मिनिटांत डिलीट; सारवासारव करत म्हणाले...