“२०२४ मध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली केंद्रात काँग्रेसचे सरकार येणार!”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 03:32 PM2021-07-14T15:32:53+5:302021-07-14T15:34:34+5:30
२०२४ मध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली केंद्रात काँग्रेसचे सरकार येणार असल्याचा मोठा दावा नाना पटोले यांनी केला.
मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून काही मुद्द्यांवरून सत्ताधारी महाविकास आघाडीत कुरबुरी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाळत ठेवणे, फोन टॅपिंगचे मोठे दावे करत स्वबळाचा नारा दिला आहे. यावरून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे अन्य पक्ष नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी काही काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी नाना पटोले अनुपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाल्या. यावरून पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, आपल्याला निमंत्रण नसल्याचे नाना पटोले म्हणाले. तसेच २०२४ मध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली केंद्रात काँग्रेसचे सरकार येणार असल्याचा मोठा दावाही पटोले यांनी केला. (nana patole claims congress will form govt in center under leadership of rahul gandhi in 2024)
नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना, याआधी सुद्धा आम्हाला धोका मिळाला आहे. २०१४ सारखा धोका पुन्हा मिळू नये, यासाठी पक्ष रणनीती आखेल. त्यानुसारच काम केले जाईल, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. शरद पवार स्वबळाच्या मुद्द्यावरुन नाराज आहेत. त्यामुळे काँग्रेस नेते त्यांना भेटायला गेले का, अशी विचारणा नाना पटोले यांना पत्रकारांनी केली. यावर बोलताना ते म्हणाले की, भाजपमुळे संपुष्टात आलेल्या ओबीसींच्या आरक्षणाच्या विरोधात आंदोलन करणार आहोत, त्यासंदर्भातील चर्चा आमच्या नेत्यांनी शरद पवारांसोबत केली, असे नाना पटोले यांनी सांगितले.
“भारत एवढा असुरक्षित यापूर्वी कधीच नव्हता”; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका
२०२४ मध्ये काँग्रेसची सत्ता केंद्रात स्थापन होईल
२०२४ मध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात काँग्रेसचे सरकार येईल. देशामध्ये भाजपला सशक्त पर्याय फक्त काँग्रेस आहे. केंद्रातील मोदी सरकारने देश विकायला काढला आहे. लोकांचे जगणे मुश्किल केले आहे. कोरोना परवडला, परंतु महागाई परवडत नाही, अशी जनभावना तयार होऊ लागली आहे, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे.
राम मंदिरासाठी योगदान दिलेल्या १२ कोटी कुटुंबांशी RSS संपर्क करणार; IT सेलही होणार सुरू
भाजप बहुजन समाज विरोधी
भारतीय जनता पक्ष हा बहुजन समाजविरोधी, ओबीसी विरोधी आहे. या समाजातील लोकांचा ते वापर करून नंतर त्यांना बाजूला करतात. याचा वारंवार अनुभव आलेला आहे. गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांचाही भाजपने वापर करुन नंतर त्यांना डावलले. खडसे यांना बदनाम केले गेले. भाजप हा बहुजन समाज विरोधी असून त्यांच्यामुळे ओबीसी व मराठा समाजाचे आरक्षणही रद्द झाले आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
“रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था नाना पटोलेंची झालीये”; भाजपचा खोचक टोला
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी भाजपतील अनेक बहुजन नेत्यांचे खच्चीकरण केले, हे सर्वांनाच माहिती आहे. खडसेंचे तर राजकीय नुकसान करण्याचा प्रयत्न झाला. झोटिंग समितीचा अहवाल अद्याप वाचला नाही. परंतु, तो पुढे येईल, तेव्हा त्यातील फार्स कळून येतील. मागील सरकारच्या काळातील अनेक चिठ्ठे बाहेर आले तर फडणवीस आणि तत्कालीन मंत्री गोत्यात येतील, असा दावा नाना पटोले केला आहे.