“देशातील तरुण राहुल गांधींना पंतप्रधानपदी पाहू इच्छितो”: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 06:38 PM2021-06-19T18:38:02+5:302021-06-19T18:39:26+5:30

काँग्रेसच्या संकल्प दिवसाच्या दिवशी माजी मंत्री डॉ. सुनिल देशमुख, दिलीप बनसोड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

nana patole says the youth of the country wants rahul gandhi to be the prime minister | “देशातील तरुण राहुल गांधींना पंतप्रधानपदी पाहू इच्छितो”: नाना पटोले

“देशातील तरुण राहुल गांधींना पंतप्रधानपदी पाहू इच्छितो”: नाना पटोले

Next

 मुंबई: देशाला आता दूरदृष्टी असलेला, सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाणारा, सर्वसमावेशक अशा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची गरज आहे आणि देशातील तरूणवर्गही राहुल गांधी यांना देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्याचे पाहू इच्छित आहे. राहुल गांधी हे मोदी सरकारविरोधात संघर्ष करत आहेत त्यांच्या या संघर्षाला ताकद देऊन महाराष्ट्रात काँग्रेसला क्रमांक एकचा पक्ष करण्याचा आपला संकल्प आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. (nana patole says the youth of the country wants rahul gandhi to be the prime minister) 

काँग्रेस नेते खासदार राहुल गाधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रदेश काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मागील ७ वर्षापासून देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार असून ते मनमानी पद्धतीने काम करत आहे. राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लोकांच्या हितासाठी अनेकदा सूचना केल्या. त्या सूचना किती हितकारक होत्या, त्याची जाणीव आता होत आहे. नोटबंदी, जीएसटी, कोरोनाचे संकट यावर त्यांनी विधायक सूचना केल्या, पण त्याकडे मोदी सरकारने लक्ष दिले नाही. त्याचा परिणाम देशातील जनतेला भोगावे लागत आहेत. राहुल गांधी यांनी मांडलेली भूमिका मोदींनी स्विकारली असती तर मोठी हानी टळली असती, असेही ते म्हणाले. 

विविध कार्यक्रमातून एक चांगला संदेश देशभरात गेला

काँग्रेस नेते खासदार राहुल गाधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रदेश काँग्रेसने केलेल्या विविध कार्यक्रमातून एक चांगला संदेश देशभरात गेला असून कोरोनामुळे संकटात असलेल्या गरजू, गरिब लोकांना रेशन, औषधे, वैद्यकीय साहित्य वाटप करून काँग्रेस पक्षाचे प्राधान्य हे प्रथम जनहित आहे हे दाखवून दिले आहे. कोरोना संकट मोदी सरकारने अत्यंत बेजबाबदारपणे हातळल्याने देश २० वर्ष मागे गेला आणि सामान्य लोकांचे संसार उघड्यावर आणले. डॉ. मनमोहनसिंह, राहुल गांधी यांनी केलेल्या सूचनांचा विचार न केल्यामुळे देशाला मृत्यूच्या खाईत लोटण्याचे काम केले आहे. या मोदी सरकारच्या खोटारडेपणाचा मुकाबला करत महाराष्ट्रासह देशभर काँग्रेस पक्षाला मजबूत करणे हाच राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचा खरा संकल्प ठरेल, असे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी म्हटले आहे.

टिळक भवनमधील कार्यक्रमाआधी संत रोहिदास चौकात नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली वाढती महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ, खाद्यतेलाची दरवाढ तसेच मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करत आंदोलन करण्यात आले. राज्यभर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारचा निषेध करत आंदोलन केले. 

दरम्यान, या कार्यक्रमाला एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, मंत्री यशोमती ठाकूर, मंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
 

Web Title: nana patole says the youth of the country wants rahul gandhi to be the prime minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.