वेगळ्या विदर्भासंदर्भातील 'त्या' ठरावाचा नाना पटोलेंनी पाठपुरावा करावा; आशिष देशमुख यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 09:35 PM2021-02-13T21:35:43+5:302021-02-13T21:42:03+5:30

Ashish Deshmukh on Vidarbha : विदर्भाचा विकास व्हायचा असेल तर स्वतंत्र राज्य हाच एकमेव पर्याय असल्याचं देशमुख यांचं मत

Nana Patole should follow my fathers resolution regarding separate Vidarbha says congress leader Ashish Deshmukh | वेगळ्या विदर्भासंदर्भातील 'त्या' ठरावाचा नाना पटोलेंनी पाठपुरावा करावा; आशिष देशमुख यांची मागणी

वेगळ्या विदर्भासंदर्भातील 'त्या' ठरावाचा नाना पटोलेंनी पाठपुरावा करावा; आशिष देशमुख यांची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देविदर्भाचा विकास व्हायचा असेल तर स्वतंत्र राज्य हाच एकमेव पर्याय असल्याचं देशमुख यांचं मतसंघटनेच्या पातळीवर काँग्रेस हा महाराष्ट्रात आणि विदर्भातही दुबळा पक्ष, देशमुख यांचं वक्तव्य

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी झालेल्या आमदार नाना पटोले यांच्या निवडीचे स्वागत करतानाच, आता नानाभाऊंनी विदर्भाला न्याय मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा काँग्रेसचे नेते माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी व्यक्त केली आहे. "नाना पटोले पदभार स्वीकारला आहे. ते विदर्भातील आहेत, याचा आम्हाला आनंद आहे. माझे वडील रणजितबाबू देशमुख प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी वेगळ्या विदर्भासंबंधीचा ठराव केला होता. त्या ठरावाचा नाना पटोलेंनी पाठपुरावा करावा," असे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले आहे.

महाराष्ट्रात व देशाच्या इतर भागांतही काँग्रेसची पिछेहाट झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडीत तीन पक्ष असले तरी त्यात काँग्रेसचा प्रभाव जाणवत नाही. तो जाणवायचा असेल आणि पक्ष संघटनेत प्राण फुंकायचे असतील तर नाना पटोले यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विदर्भाचे नाहीत. सिंचन-उद्योगासारखी महत्त्वाची खाती विदर्भाकडे नाहीत. अशा वेळी सर्व क्षेत्रांत विदर्भाला न्याय मिळायचा असेल तर सरकारमध्ये सहभागी असूनही पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसजन विदर्भाला झुकते माप मिळवून दिले पाहिजे अशी विदर्भातील जनतेची अपेक्षा असल्याचे देशमुख म्हणाले. "नाना पटोले विदर्भवादी आहेत. त्यांनी आता स्वतंत्र विदर्भ राज्याचा आवाज बुलंद केला पाहिजे. आमचे नेते राहुल गांधी यांचा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यांनी स्वतंत्र विदर्भासंबंधी भूतकाळात झालेल्या प्रयत्नांचा सर्वंकष आढावा राहुल गांधींच्या कानावर घालावा आणि राज्य निर्मितीच्या दृष्टीने हालचाली सुरू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे," असंही त्यांनी नमूद केलं.



स्वतंत्र विदर्भ हाच पर्याय

"विदर्भाचा विकास व्हायचा असेल तर स्वतंत्र राज्य हाच एकमेव पर्याय आहे. त्यासाठी गतकाळात भरपूर प्रयत्न झाले. परंतु, त्यांना यश आले नाही. स्वतंत्र विदर्भाची मागणी फार जुनी आहे. अनेकांनी या मागणीचा अभ्यास केला. अनेक प्रकारच्या समित्या व अहवाल झाले. त्यात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या समितीचा समावेश होता. राज्य पुनर्रचना आयोगाने विदर्भाचे राज्य आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकते असे मत नोंदवले होते. शिवसेना वगळता इतर सर्व पक्षांचे या मागणीला समर्थन आहे. भाजपने तर राष्ट्रीय अधिवेशनात स्वतंत्र राज्याचा ठराव केला होता. त्या ठरावाची नानाभाऊंनी केंद्रातील मोदी सरकारला आठवण करून दिली पाहिजे," असे मतही डॉ. देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

संघटना पातळीवर काँग्रेस दुबळा पक्ष

"संघटनेच्या पातळीवर काँग्रेस हा महाराष्ट्रात आणि विदर्भातही दुबळा पक्ष आहे, हे आपण मान्य केले पाहिजे. जोवर आपण हे वास्तव मान्य करीत नाही, तोवर आपण त्यासंदर्भात कोणतेही पाऊल उचलण्याचे धाडस दाखवणार नाही. फक्त सत्ताप्राप्ती हे काँग्रेसचे ध्येय कधीच नव्हते. स्वातंत्र्य लढ्यातील सिंहाचे योगदान हे या पक्षाचे बलस्थान आहे. स्वातंत्र्योत्तर काळात या देशाच्या विकासात काँग्रेसने जी भूमिका बजावली, त्याची नोंद इतिहासात झालेलीच आहे. अत्यंत वाईट स्थितीत असलेल्या देशाला जागतिक पातळीवर एक मातब्बर राष्ट्र म्हणून मान्यता प्राप्त करून देणे हे काँग्रेसचेच कर्तृत्व आहे. त्यामुळेच काँग्रेसवर सामान्य जनतेचा विश्वास आहे. परंतु, पक्ष संघटनेच्या पातळीवर बळकट झाल्याखेरीज काँग्रेसला गतवैभव प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे पटोले यांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा हाताळतानाच संघटनात्मक बळकटीकरणाकडेही लक्ष दिले पाहिजे अशी आपली आग्रही विनंती आहे," असं देशमुख यांनी नमूद केलं.

Web Title: Nana Patole should follow my fathers resolution regarding separate Vidarbha says congress leader Ashish Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.