'आम्ही फक्त एचके पाटील यांच्या मताला महत्त्व देतो, नाना पटोलेंना शरद पवारांनी योग्य उत्तर दिलंय'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 12:17 PM2021-07-16T12:17:09+5:302021-07-16T18:18:08+5:30
praful patel slams nana patole: 'एचके पाटील काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत, ते थेट हायकमांडचे प्रतिनिधी म्हणून ते बोलतात. त्यांच्या बोलण्यात तथ्य असतं.'
नागपूर: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर 'नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर मी कशाला बोलू', असा खोचक टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार(Sharad Pawar) यांनी केला. यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल(Praful Patel) यांनीही नाना पटोलेंवर निशाणा साधलाय.
एचके पाटील यांच्या बोलण्यात तथ्य असतं
प्रफुल्ल पटेल यांनी नागपूरात मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना काँग्रेसकडून वारंवार होत असलेल्या स्वबळाच्या भाषेवर प्रश्न करण्यात आला. यावर 'आम्ही फक्त एच.के. पाटील काय म्हणतात त्याला महत्त्व देतो. कारण त्यांच्या बोलण्यात तथ्य असतं', अशा शब्दात नानांना अप्रत्यक्ष टोला लगावला. तसेच, 'ज्यांना जे करायचंय त्यांनी ते करावं. कुणीच कुणाला बांधून ठेवलेलं नाही. आम्ही रोज रोज उत्तरं का द्यावीत?' असा सवालही पटेलांनी केला.
'एचके पाटील काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. ते थेट हायकमांडचे प्रतिनिधी म्हणून ते बोलतात. त्यांच्या बोलण्यात तथ्य असतं, त्यामुळे आम्ही त्यांच्या बोलण्याला महत्त्व देतो', असं म्हणत पटेलांनी नाना पटोलेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. तसेच, 'एचके पाटील, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे तिन्ही नेते शरद पवारांना भेटले. त्यानंतर हे तिन्ही नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. याचा अर्थ काय होतो, तुम्हाला माहीतच आहे,' असेही म्हणाले.
शरद पवारांनी सविस्तर उत्तर दिलंय
प्रफुल पटेल पुढे म्हणाले की, 'शरद पवार महाविकास आघाडीचे जनक आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात हे सरकार सुरू आहे. महाविकास आघाडीला शरद पवारांचं मार्गदर्शन आहे आणि पुढेही राहील. नाना पटोले रोज बोलतात, त्याना रोज काय उत्तरं द्यावं ? त्याना सविस्तर उत्तर शरद पवारांनी दिलंय. म्हणून त्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाही, असेही ते म्हणाले.