'पवार आमचे मित्र; पण पाठिंबा घेण्याचा प्रश्नच नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 04:29 AM2019-04-21T04:29:49+5:302019-04-21T06:58:39+5:30
पीयूष गोयल यानी स्पष्ट केली भूमिका
भाजपला किती जागा मिळतील?
पूर्वीपेक्षा जास्त. ईशान्य, ओडिशा, पश्चिम बंगाल व दक्षिणेतील राज्यांत आमची ताकद वाढली आहे. पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियताही काम करीत आहे.
या निवडणुकीतील मुद्दे काय आहेत?
महागाई नियंत्रणात आहे. देश जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था बनला आहे. अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले आहेत. मोदी सरकारने लष्कराला पूर्ण मोकळीक दिली आहे.
प्रज्ञासिंग यांच्या वक्तव्याविषयी?
पक्षाने भूमिका जाहीर केली आहे. प्रज्ञा यांनीही स्पष्टिकरण दिले आहे.
उत्तर प्रदेश, बिहारात महागठबंधनचे आव्हान आहे?
नाही. आम्ही बिहारात आघाडी घेऊ. उत्तर प्रदेशातही पूर्वीपेक्षा जास्त जागा जिंकू. कदाचित रायबरेली व अमेठीही आम्ही जिंकू शकू. राहुल गांधी मैदान सोडून वायनाडला पळाले आहेत.
गेल्या वेळी मोदीही दोन ठिकाणांहून लढत होते?
राहुल यांनी अमेठीत काम केलेले नाही. पंतप्रधानांची तेथील रॅली पाहा. राहुल गांधी यांना तेथून जिंकणे अशक्य होऊ शकते.
प्रियांका गांधी भाजपवर जोरदार टीका करीत आहेत. पण भाजप गप्प आहे. कोणती भीती आहे? त्या वाराणसीतून लढणार असल्याचेही बोलले जाते. प्रियांका गांधी यांचे आम्ही स्वागत करतो, पण जनता स्वागतास तयार नाही. अयोध्येत त्यांच्या स्वागताला १00-२00 लोकही नव्हते. या निवडणुकीत गांधी परिवाराचा मुखवटा फाटेल. अमेठीत राहुल गांधी हरतील. वाराणसीत प्रियांका गांधी हरतील.
बिहारमध्ये तुमचे मंत्री गिरीराज सिंह बेगूसराय येथून लढण्यास घाबरत आहेत. रविशंकर प्रसाद यांना शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरोधात का उभे केले?
गिरीराज घाबरले नाहीत. ते ताकदीनिशी लढत आहेत. निवडणुकीत मतदारसंघ बदलण्यावरून काही नाराजी असते. ती दूर झाली आहे. रविशंकर प्रसाद यांना मागील निवडणुकीतच पाटणासाहिबमधून तिकीट दिले जाणार होते. अखेरीस सिन्हा यांना दिले, पण बिहारमध्ये आमचा मोठा विजय होईल. त्यात पाटणासाहिबही असेल.
राज ठाकरे यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीबद्दल काय म्हणाल?
त्यांच्या सभांचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही. ते काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसचे स्टार कॅम्पेनर तर नाहीत ना? त्यांच्या सभांचा खर्च काँग्रेस-राष्टÑवादीच्या खात्यात गणला गेला पाहिजे.
गेल्या वेळी नरेंद्र मोदी यांनी बारामतीमध्ये सभा घेतली होती. परंतु यावेळी ते तेथे जाणार नाहीत?
पंतप्रधान १५० हून अधिक सभा घेणार आहेत. बारामतीची मला माहिती नाही, पण शक्यता अशी आहे की, त्याच्या जवळपासच्या एखाद्या मतदारसंघात सभा असल्याने ते बारामतीत जाणार नसावेत.
शरद पवार यांच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहता? ते वेळेवर मैत्री निभावतात. गुजरात विधानसभा निवडणुकीच्यावेळी हे पाहावयास मिळाले. गरज पडल्यास सरकार स्थापन करण्यासाठी त्यांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत भाजप घेईल का?
राजकारणात तर सर्वच जण आमचे मित्र आहेत. कधी राजकीय स्पर्धा-प्रतिस्पर्धेतून आम्ही कोणाशीही व्यक्तिगत शत्रुत्वाच्या भावनेतून बघत नाही. तथापि, राष्टÑवादीची मदत घेण्याच्या मुद्द्यावर मला वाटते की, याचा प्रश्नच येणार नाही.
मुलाखत : संतोष ठाकुर/विकास झाडे