प्रियंका गांधी लढवणार निवडणूक; काँग्रेसने केली उमेदवारीची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 09:40 PM2024-10-15T21:40:50+5:302024-10-15T21:42:57+5:30
Wayanad Lok Sabha By Election 2024: लोकसभा निवडणुकीत प्रियंका गांधी अमेठीतून निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. पण त्यांनी निवडणूक लढणं टाळलं. अखेर प्रियंका गांधी यांना काँग्रेसने निवडणुकीत उतरवलं आहे.
Priyanka Gandhi wayanad lok sabha by election: काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींनी अखेर संसदीय राजकारणात पाऊल ठेवलं. काँग्रेसनेप्रियंका गांधी यांची उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसने केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात होत पोटनिवडणुकीसाठी प्रियंका गांधी यांच्या नावाची घोषणा केली आहे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. रायबरेली आणि वायनाड या दोन्ही मतदारसंघातून राहुल गांधी विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा दिला. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती.
The Congress President, Shri Mallikarjun Kharge, has approved the proposal to nominate the following members as party candidates for the bye-elections to the Lok Sabha and Legislative Assembly from Kerala: pic.twitter.com/aWbQzrNq3i
— INC Sandesh (@INCSandesh) October 15, 2024
राहुल गांधींचा झाला होता दणदणीत विजय
जून २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. २०१९ मध्ये राहुल गांधींना ४ लाख ३१ हजार मते मिळाली होती. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही राहुल गांधी यांना ३ लाख ६४ हजार ४२२ मते मिळाली होती. राहुल गांधींनी सीपीआय नेते एन राजा यांचा पराभव केला होता.
प्रियंका गांधी पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. जूनमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्या अमेठी किंवा रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. दोन्ही मतदारसंघ काँग्रेसचे परंपरागत मतदारसंघ आहेत. यावेळी काँग्रेसने रायबरेलीतून राहुल गांधी, तर अमेठीतून किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी स्मृती इराणींचा पराभव केला.