"भाजपाशी हातमिळवणी केल्याचे सिद्ध करा, लगेच राजीनामा देईन," ज्येष्ठ नेत्याने राहुल गांधींना सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 02:57 PM2020-08-24T14:57:48+5:302020-08-24T15:09:01+5:30
काँग्रेसमध्ये सध्या मोठा वाद उफाळून आला आहे. त्यातच काही जेष्ठ नेत्यांनी सोनिया गांधीना पत्र लिहून नेतृत्व बदलाबाबत मागणी केली होती. त्यावरून या नेत्यांनी भाजापशी हातमिळवणी केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केल्याने काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते संतप्त झाले आहे.
नवी दिल्ली - सलग दोन लोकसभा निवडणुकीत झालेले पराभव आणि काही राज्यांमधील सत्ता संपुष्टात आल्याने राजकीयदृष्ट्या कमकुवत झालेल्या काँग्रेसमध्ये सध्या मोठा वाद उफाळून आला आहे. त्यातच काही जेष्ठ नेत्यांनी सोनिया गांधीना पत्र लिहून नेतृत्व बदलाबाबत मागणी केली होती. त्यावरून या नेत्यांनी भाजापशी हातमिळवणी केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केल्याने काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते संतप्त झाले आहे. एकीकडे कपिल सिब्बल यांनी ट्विट करून राहुल गांधींच्या विधानाबाबत नाराजी व्यक्त केली असतानाच गुलाम नबी आझाद यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्याला आक्षेप घेतला आहे.
राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांप्रमाणे जर मी भाजपाशी कुठल्याही प्रकारची हात मिळवणी केल्याचे निष्पन्न झाले तर मी राजीनामा देईन, असे थेट आव्हानच गुलाम नवी आझाद यांनी दिले आहे. तसेच असे पत्र लिहिण्याचे कारण हे काँग्रेसची कार्यसमिती होती, असेही त्यांनी सांगितले.पक्षामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी काही ज्येष्ठ नेत्यांनी लिहिलेले पत्र हा भाजपाशी केलेल्या हातमिळवणीचा परिणाम आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. तसेच या पत्राच्या वेळेवरही राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान, गुलाम नबी आझाद यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाबाबत प्रियंका गांधी यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. आझाद हे जे काही सांगत आहेत त्याच्या एकदम विरुद्ध मत त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कपिल सिब्बल यांनीही ट्विट करून राहुल गांधींना अतिशय आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं आहे. 'आम्ही भाजपाशी संगनमत केलंय, असं राहुल गांधी म्हणतात. राजस्थान उच्च न्यायालयात पक्षाची बाजू यशस्वीपणे मांडली. मणीपूरमध्ये भाजपा सरकारविरोधात पक्षाची बाजू मांडली. गेल्या ३० वर्षांत भाजपाच्या पथ्यावर पडेल, असं एकही विधान केलं नाही. तरी आम्ही भाजपाची हातमिळवणी केल्याचं म्हटलं जातं,' अशा शब्दांत सिब्बल यांनी स्पष्टपणे त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीपूर्वी पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांमध्ये गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांचा समावेश होता.
सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय?
देशभरातील काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षात मोठ्या बदलांची गरज असल्याचं मत त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष गरजेचा असल्याची महत्त्वाची मागणी २३ नेत्यांनी पत्रातून केली. यामध्ये काँग्रेस कार्यसमितीच्या अनेक सदस्यांसह, पाच माजी मुख्यमंत्री, खासदार आणि माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. पक्ष जनाधार आणि तरुणांचा विश्वास गमावत आहे. पक्षाला प्रभावी नेतृत्त्वाची गरज आहे. तो केवळ काम करताना दिसू नये, तर त्याचं काम प्रत्यक्ष जमिनीवर दिसायला हवं. सीडब्ल्यूसीची निवडणूक व्हायला हवी आणि पक्षाला पुन्हा उभारी घ्यावी यासाठी ठोस योजना तयार करायला हवी, असं २३ नेत्यांनी पत्रात म्हटलं आहे.
काँग्रेस नेत्यांनी मांडल्या अडचणी-
१. राज्य काँग्रेसचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तांमध्ये नाहक विलंब.
२. सन्मान आणि स्वीकारार्ह असलेल्या नेत्यांच्या प्रदेश काँग्रेसवर नियुक्त्या होत नाहीत.
३. राज्य प्रमुखांना संघटनेशी संबंधित निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही.
४. युथ काँग्रेस आणि एनएसयूआयमधील निवडणुकांमुळे संतुलन बिघडलं.
काँग्रेस नेत्यांच्या मागण्या काय?
१. नेतृत्वात स्थायी आणि प्रभावी बदल व्हावेत.
२. काँग्रेस कार्यकारी समितीच्या निवडणूक व्हाव्यात
३. पक्षानं गमावलेली ताकद परत मिळवण्यासाठी योजना गरजेची
४. संघटनेतील प्रत्येक स्तरावर निवडणूक व्हावी
५. संसदीय पार्टी बोर्डाची स्थापना व्हावी.
६. प्रदेश काँग्रेसला ताकद दिली जावी.
पत्रावर कोणाच्या स्वाक्षऱ्या?
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाम, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, शशी थरूर, खासदार विवेक तनखा, अकउउ आणि उहउ चे मुकुल वासनिक आणि जितिन प्रसाद, माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, राजेंद्र कौर भटट्ल, वीरप्पा मोइली, पृथ्वीराज चव्हाण, पी. जे. कुरियन, अजय सिंह, रेणुका चौधरी आणि मिलिंद देवरा, प्रदेशाध्यक्ष सांभाळण्याचा अनुभव असलेले राज बब्बर, अरविंदर सिंह लवली, कौल सिंह यांच्यासह अखिलेश प्रसाद सिंह, कुलदीप शर्मा, योगानंद शास्त्री आणि संदीप दीक्षित.