Rahul Gandhi: राहुल गांधींनी प. बंगालमधील सर्व सभा केल्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 04:32 AM2021-04-19T04:32:50+5:302021-04-19T04:33:10+5:30

CoronaVirus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय : काँग्रेसने केली भाजप नेतृत्वावर टीका 

Rahul Gandhi All rally in west Bengal canceled | Rahul Gandhi: राहुल गांधींनी प. बंगालमधील सर्व सभा केल्या रद्द

Rahul Gandhi: राहुल गांधींनी प. बंगालमधील सर्व सभा केल्या रद्द

googlenewsNext

हरीश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : देशातील कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील आपल्या सर्व निवडणूक रॅली रद्द केल्या आहेत. मोठ्या सभा घेण्यापूर्वी त्याचे काय परिणाम होतील, याचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी अन्य नेत्यांना केले आहे. 


राहुल गांधी यांनी ट्वीट केले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी प. बंगालमधील माझ्या सर्व सभा स्थगित करत आहे. मी सर्व नेत्यांना सांगू इच्छितो की, सध्याच्या परिस्थितीत मोठ्या सभा, रॅली आयोजित करण्यापूर्वी त्याचे काय परिणाम होतील, याचा विचार करा. प. बंगालमधील भाजप नेत्यांच्या रॅलीतील गर्दीकडे संभाव्य इशारा करताना त्यांनी म्हटले आहे की, एवढ्या मोठ्या संख्येने आजारी लोक आणि मृतांची संख्या प्रथमच दिसून येत आहे. 


देशात कोरोना रुग्ण वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे मोठ्या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत. यावरून काँग्रेस सातत्याने त्यांच्यावर टीका करत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी आरोप केला आहे की, कोरोना साथीला तोंड देण्याऐवजी मोदी हे प. बंगालमधील विधानसभा निवडणुकीत प्रचार करून संवेदनशून्यता दाखवत आहेत. सभा रद्द केल्याबद्दल राहुल गांधी यांचे कौतुक करताना काँग्रेसचे प्रवक्ते जयवीर गिल यांनी म्हटले आहे की, भाजपने अहंकार सोडून राहुल गांधी यांचे अनुसरण करायला हवे. 

राष्ट्रीय नेत्यांच्या प्रचारसभा कमी करण्याचा भाजपचा विचार
देशात कोरोना विषाणूचा फैलाव भीती वाटावी, अशा वेगाने होत असताना वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना त्या संकटाची अखेर जाणीव झाली आहे. जनता दलाने (संयुक्त) दिल्ली आणि पाटण्यातील आपली मुख्यालये बंद केली. पश्चिम बंगालमध्ये मतदानाचे तीन टप्पे राहिले असून त्यात भाजपच्या काही राष्ट्रीय नेत्यांच्या होणाऱ्या प्रचारसभा कमी करण्याचा विचार पक्षाचे नेतृत्व करीत आहे. मात्र, अजून निर्णय जाहीर झालेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संत आणि धार्मिक नेत्यांना कुंभमेळा प्रतीकात्मक करण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद म्हणून तीन प्रमुख आखाड्यांनी कुंभमेळा प्रतीकात्मक केल्याचे जाहीर केले. 

इतर आखाड्यांनी हा निर्णय अजून मान्य केलेला नाही. तथापि, मोदी शनिवारी पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे मोठ्या प्रचारसभेला गेले होते. काँग्रेसमधील सूत्रांनी म्हटले की, प्रियांका गांधी यादेखील आता पश्चिम बंगालमध्ये प्रचार करणार नाहीत. त्या आठवडाभर विलगीकरणात होत्या. बिहारमध्ये कोविडचा फैलाव खूप वेगात होत असल्यामुळे सत्ताधारी जनता दलाने पाटणा आणि दिल्लीतील आपली मुख्यालये बंद केली आहेत. 

Web Title: Rahul Gandhi All rally in west Bengal canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.