गलती से मिस्टेक! राहुल गांधींचा गरिबीऐवजी गरिबांवर वार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 04:45 PM2019-04-02T16:45:39+5:302019-04-02T16:47:12+5:30
न्याय योजनेची घोषणा करताना राहुल गांधींची चूक
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज काँग्रेसनं जाहीरनामा जाहीर केला. या जाहीरनाम्याला काँग्रेसनं 'जन आवाज' असं नाव दिलं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनामा पुस्तिकेच्या मुखपृष्ठावर 'हम निभाएंगे' असं लिहिण्यात आलं आहे. काँग्रेसनं अपेक्षेप्रमाणे या जाहीरनाम्यात न्याय योजनेचा उल्लेख केला. याबद्दल पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना राहुल गांधींकडून एक चूक झाली. गरिबीवर वार म्हणण्याऐवजी ते चुकून गरिबांवर वार असं म्हणाले.
राहुल गांधींनी न्याय योजनेसह काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील पाच महत्त्वाच्या घोषणांची माहिती दिली. यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यावेळी न्याय योजनेवर भाष्य करताना राहुल गांधी गडबडले. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी जर 30 हजार कोटी रुपये उद्योगपतींना देऊ शकतात, तर आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करु शकतो. आमची भूमिका स्पष्ट आहे. 72 हजार गरिबांवर वार, 72000,' असं राहुल म्हणाले. आपल्याला गरिबीवर वार करायचा आहे, असं राहुल गांधींना म्हणायचं होतं. मात्र चुकून ते गरिबांवर वार असं म्हणून गेले.
विशेष म्हणजे राहुल गांधींना त्यांची चूक लक्षातच आली नाही. ते यानंतरही बोलतच होते. त्यांनी उपस्थित पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरंदेखील दिली. पत्रकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनादेखील प्रश्न विचारायला हवेत, असं राहुल यांनी म्हटलं. मोदी पत्रकार परिषद घेण्यास का घाबरतात, असा प्रश्न पत्रकारांनी मोदींना विचारायला हवा, असं काँग्रेस अध्यक्ष म्हणाले. यावेळी राहुल गांधींनी न्याय योजनेसोबतच इतर चार मुद्द्यांवरही भाष्य केलं. काँग्रेसचं निवडणूक चिन्ह असलेल्या पंजाला पाच बोटं आहेत. त्याप्रमाणेच काँग्रेसच्या जाहीरमान्यातही पाच प्रमुख घोषणा असल्याचं यावेळी पक्षाध्यक्ष राहुल गांधींनी सांगितलं. न्याय योजनेसह रोजगार, शेतकरी, शिक्षण आणि आरोग्य या पाच मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून जाहीरनामा तयार करण्यात आल्याची माहिती यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी दिली.