युवक काँग्रेसमधून ‘राहुल गांधी पॅटर्न’ संपुष्टात येणार; पुन्हा संघटनात्मक हायब्रिड पॅटर्न सुरु करणार
By प्रविण मरगळे | Published: December 17, 2020 12:09 PM2020-12-17T12:09:40+5:302020-12-17T12:10:53+5:30
सचिन पायलट यांच्या गटाने बंडखोरी केल्यानंतर १४ जुलै रोजी तत्कालीन युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि आमदार मुकेश भाकर यांना पदावरून निलंबित केले होते
जयपूर - युवक काँग्रेसमध्ये मागील एक दशकापासून सुरु असलेल्या ‘राहुल गांधी पॅटर्न’मध्ये त्रुटी आढळल्यानंतर आता यात बदल करण्याची तयारी सुरु झाली आहे. युवक काँग्रेसच्या संघटनेत हायब्रिड पॅटर्न राबवण्यात येणार आहे. युवक काँग्रेसमध्ये राहुल गांधी पॅटर्न अंतर्गत मागील १२ वर्षापासून संघटनेच्या पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक घेतली जात होती, ६-७ वर्ष संघटनात्मक निवडणुकीत विलंब झाल्याने आता पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केल्यानंतर पॅटर्न लागू करण्याचं काम सुरु करणार आहेत.
युवक काँग्रेसमध्ये हायब्रिड पॅटर्न अंतर्गत आता निवडणूक आलेल्या पदाधिकाऱ्यांसोबत नियुक्त्याही केल्या जाणार आहेत. युवक काँग्रेसचे प्रदेश प्रभारी डॉ. पलक वर्मा म्हणाले की, राजस्थान युवक काँग्रेसमध्ये ४०० ब्लॉक अध्यक्षांची लवकरच नियुक्ती केली जाणार आहे, युवक काँग्रेसमध्ये निवडणुका सुरु झाल्यानंतर ब्लॉक अध्यक्ष पद कार्यकाळ संपुष्टात येईल, त्यामुळे १० वर्षानंतर पुन्हा ब्लॉक अध्यक्ष नियुक्त होणार आहेत.
सचिन पायलट यांच्या गटाने बंडखोरी केल्यानंतर १४ जुलै रोजी तत्कालीन युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि आमदार मुकेश भाकर यांना पदावरून निलंबित केले होते, भाकर यांच्या जागी आमदार गणेश घोघरा यांना संघटनेची जबाबदारी दिली होती, तेव्हापासून युवक काँग्रेसमध्ये निवडून न येता नियुक्त केलेल्या प्रदेशाध्यक्ष पॅटर्नची सुरुवात झाली, काँग्रेसमधील सर्वाधिक नेते युवक काँग्रेस आणि एनएसयूआयच्या संघटनेत निवडणूक घेण्याच्या विरोधात आहेत. या निवडणुकीत पैशाचा वापर होत असल्याची अनेक उदाहरणं समोर आली, तर निवडणूक प्रक्रियेवरही अनेकांनी आक्षेप घेतले होते,
कालांतराने जुना पॅटर्न लागू करणार
यावेळी युवक काँग्रेसच्या संघटनेच्या निवडणूक निकालापूर्वीच सुमित भगासरा यांना विजयी झाल्याचं सांगितले होते, भगासरा काही महिने पदावर राहिले त्यानंतर पुन्हा निवडणुकीचा निकाल जारी केला, यात मुकेश भाकर विजयी झाल्याचं सांगण्यात आलं, त्यामुळे या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते, त्यामुळे आता युवक काँग्रेसमध्ये राहुल गांधी पॅटर्न हळूहळू संपवण्याचा प्लॅन सुरु झाला आहे, प्रदेशाध्यक्ष नियुक्तीने झाल्याने आता इतर पदाधिकाऱ्यांची निवडही नियुक्तीद्वारे केली जाणार आहे, ब्लॉकपासून सुरुवात करून पुन्हा जुना पॅटर्न लागू केला जाणार आहे.