पक्ष बळकट झाला तरच राहुल गांधी पंतप्रधान; ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 02:15 AM2020-08-29T02:15:11+5:302020-08-29T07:23:58+5:30
आझाद यांनी शुक्रवारी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सोनिया गांधी यांची प्रशंसा करताना म्हटले की, ‘‘त्यांनी कठीण काळात पक्ष चालवला.
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी समितीपासून ते सगळ्या पदांसाठी निवडणूक होत नाही तोपर्यंत पक्ष बळकट होणार नाही. पक्ष बळकट होईल तेव्हाच राहुल गांधी पंतप्रधान होणे शक्य आहे, अशी स्पष्ट भूमिका पक्षाचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी घेतली. ते म्हणाले, ‘‘आम्ही हाच मुद्दा उपस्थित केल्यावर ज्या लोकांना जनाधार नाही तेच याला विरोध करीत आहेत. ते लोक फक्त लाळघोटेपणा करून पदावर राहू इच्छितात.’’
आझाद यांनी शुक्रवारी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सोनिया गांधी यांची प्रशंसा करताना म्हटले की, ‘‘त्यांनी कठीण काळात पक्ष चालवला. त्या हंगामी अध्यक्ष होत्या त्यामुळे प्रदीर्घ काळ त्या पदावर राहू शकत नाहीत. राहुल गांधी अध्यक्ष होऊ इच्छित नाहीत त्यामुळे आम्ही पूर्णवेळ अध्यक्ष असावी, अशी मागणी केली.’’
पक्षातील राहुल गांधी यांचे समर्थन करणाऱ्या युवक नेत्यांवर थेट हल्ला करताना आझाद यांनी या मंडळींनी पक्षासाठी काय काम केले? असा प्रश्न विचारला. आम्ही या पक्षासाठी राजीव गांधी, सीताराम केसरी, पी. व्ही. नरसिंह राव आणि इंदिरा गांधी यांच्यासमवेत काम केले आणि संघटनेच्या निवडणुकाही पाहिल्या. परंतु, ३० वर्षांपासून निवडणूका झालेल्याच नाहीत. आमची मागणी आहे की, गटापासून जिल्हा, जिल्ह्यापासून प्रदेश आणि प्रदेशापासून केंद्रीय स्तरावर थेट निवडणुका व्हाव्यात. पूर्णवेळचा अध्यक्ष असावा. आम्ही बळकट होऊन भाजपला टक्कर देऊ शकू, असेही ते म्हणाले. गुलाम नबी आझाद यांचा आक्रमकपणा हे दाखवत होता की, हा संघर्ष राहुल गांधींचे पाठीराखे व जुन्या नेत्यांमधील असून तो असा सहज संपणारा नाही. २३ नेत्यांनी लिहिलेले पत्र आझाद यांना कोणत्याच दृष्टिकोनातून चुकीचे वाटत नाही. त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे की, राहुल गांधींचे समर्थक लाळघोटेपणा करून पदांवर राहू इच्छितात.