प्रियंकानं बांधलेली राखी काढत नाही, नेहमीच बांधून ठेवतो- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 04:46 PM2019-04-05T16:46:22+5:302019-04-05T16:47:05+5:30
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रियंका गांधीही भावुक झाल्या होत्या.
पुणे- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राजकारणात सक्रिय झालेल्या प्रियंका गांधी यांच्या भावनिक नात्यासंदर्भात नेहमीच बातम्या येत असतात. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रियंका गांधीही भावुक झाल्या होत्या. मतदारांनो माझ्या भावाची सांभाळा, तो खूप धाडसी आहे, तुमची नक्कीच काळजी घेईल, अशी भावनिक साद काल प्रियंका गांधींनी मतदारांना घातली होती. त्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही प्रतिक्रिया दिली आहे.
बहिणीचे आणि माझे नाते खास आहे, आम्ही एकत्र वाढलो, काही वेळा एकमेकांसाठी माघार घेतली, तिने बांधलेली राखी मी तुटल्याशिवाय काढत नाही, लहानपणी भांडायचो पण आता नाही भांडत. ती मला गोड खाऊ खालून जाड करण्याची प्रयत्न करते, ती माझी बेस्ट फ्रेंड आहे, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत. राहुल यांनी आज पुण्यातील एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. शिक्षण, बेरोजगारी, ७२ हजाराचा 'न्याय', याबाबत काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली आणि मोदी सरकारच्या अपयशावरही बोट ठेवलं.
दुसरीकडे राहुल गांधींनी मोदी सरकारलाही लक्ष्य केलं. भर लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठी मारून 'प्रेमाचा संदेश' देण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा 'प्यार की बात' केली आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर माझं प्रेम आहे. माझ्या मनात त्यांच्याबद्दल राग नाही. पण ते माझा तिरस्कार करतात. अर्थात, त्यालाही माझी हरकत नाही, असं टिप्पणी राहुल यांनी केली. मोदी हे द्वेषाचं राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस सातत्याने करत आहे. त्यावरच राहुल गांधींनी पुन्हा निशाणा साधला.