महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राहुल गांधी ठरविणार उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 06:04 AM2021-06-11T06:04:12+5:302021-06-11T06:04:50+5:30
Rahul Gandhi : राजीव सातव यांच्या पत्नीचाही राज्यसभेसाठी विचार होऊ शकतो अशी चर्चा आहे.
- व्यंकटेश केसरी
नवी दिल्ली : काँग्रेसचेराज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या त्या जागेवर कोणता उमेदवार निवडावा याचा निर्णय काँग्रेस नेते राहुल गांधी घेणार आहेत. त्यांच्या या निर्णयावर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी शिक्कामोर्तब करतील. या जागेसाठी काँग्रेसमधील अनेक नेते इच्छुक असून त्यांनी त्या दिशेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राजीव सातव यांच्या पत्नीचाही राज्यसभेसाठी विचार होऊ शकतो अशी चर्चा आहे.
काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभेची ही रिक्त जागा मित्रपक्षांशी झालेल्या समझोत्यानुसार यापुढेही काँग्रेसकडेच राहाणार आहे. त्या जागेसाठी पोटनिवडणूक कधी होणार हे मात्र अद्याप जाहीर झालेले नाही. या जागेवरून राज्यसभेवर जाण्यासाठी काँग्रेसमधील गुलाम नबी आझाद, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा, अविनाश पांडे, उत्तमसिंह पवार, अनंत गाडगीळ, रजनी पाटील असे अनेक काँग्रेस नेते उत्सुक आहेत. काँग्रेसच्या विद्यमान कार्यपद्धतीबद्दल ज्या २३ नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती त्यामध्ये गुलाम नबी आझाद व मुकुल वासनिक यांचा समावेश आहे.
उत्तमसिंह पवार, गाडगीळ यांच्या नावांचीही चर्चा
सचिन पायलट यांच्या अयशस्वी बंडाच्या प्रयत्नानंतर अविनाश पांडे यांच्याकडून राजस्थानचे प्रभारीपद काँग्रेसने काढून घेतले होते. काँग्रेस नेत्या रजनी पाटील या महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी उत्सुक असल्याचे सूत्रांनी सांगितले. काँग्रेस नेते अनंत गाडगीळ तसेच उत्तमसिंह पवार यांंनाही राज्यसभेवर जाण्याची इच्छा आहे.