राहुल गांधी अचानक परदेशी का गेले?; खासदार सातव यांनी सांगितलं कारण
By कुणाल गवाणकर | Published: December 28, 2020 12:47 PM2020-12-28T12:47:53+5:302020-12-28T12:49:53+5:30
काँग्रेसच्या स्थापना दिनाला राहुल गांधी अनुपस्थित; भाजप नेत्यांकडून टीकास्त्र
नवी दिल्ली: काँग्रेसच्या १३६ व्या स्थापना दिनानिमित्त आज पक्षाकडून देशात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी परदेशात गेले आहेत. त्यावरून भारतीय जनता पक्षाकडून राहुल गांधींना लक्ष्य करण्यात येत आहे. भाजपकडून होत असलेल्या टीकेला काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
राहुल गांधींची आजी आजारी आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं राहुल गांधी देशाबाहेर गेले आहेत. आपल्या घरातील एखादी व्यक्ती, नातेवाईक आजारी असल्यास आपण सर्व काही सोडून त्यांच्यासाठी धावून जातो, असं राजीव सातव यांनी सांगितलं. 'दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना राहुल गांधी परदेशात गेल्याचं भाजप नेते म्हणतात. पण पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांसोबत चर्चा करत नाहीत. देशाच्या अर्थव्यवस्थेची पूर्णपणे वाताहत झाली आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. पण तरीही मोदी याबद्दल चकार शब्द काढत नाहीत,' अशा शब्दांत सातव यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.
Rahul Gandhi has gone to see his grandmother. Is it wrong? Everybody has the right to undertake personal visits. BJP is indulging in low-level politics. They are targeting Rahul Gandhi because they want to target only one leader: Congress General Secretary KC Venugopal pic.twitter.com/5bqLkzvOX4
— ANI (@ANI) December 28, 2020
देशावर कोरोनाचं संकट येणार असा धोक्याचा इशारा राहुल गांधींनी फेब्रुवारी महिन्यातच दिला होता. पण राहुल यांनी सतर्कतेचा इशारा देऊनही सरकारनं काय केलं?, असा सवाल सातव यांनी उपस्थित केला. सगळे प्रश्न राहुल यांना विचारले जातात. पण पंतप्रधान ६ वर्षांत एकही पत्रकार परिषद घेत नाहीत, असं सातव म्हणाले.
We have informed before also that Rahul Gandhi is travelling on a short personal visit and he will be among us very soon: Congress leader Randeep Surjewala on Rahul Gandhi's absence during celebrations of 136th Foundation Day of Congress pic.twitter.com/e9I4EyX1lQ
— ANI (@ANI) December 28, 2020
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना सक्तवसुली संचलनालयानं नोटीस पाठवली आहे. त्यावरूनही सातव यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. भाजप, केंद्र सरकारच्या विरोधात बोललं की ईडी, सीबीआयच्या नोटीस येतात. भाजप नेत्यांना मात्र कधीही ईडी, सीबीआय नोटीस बजावत नाही. ईडी, सीबीआयनं आता त्यांचं कार्यालय भाजप कार्यालयात हलवावं. म्हणजे त्यांचा संवाद जास्त चांगला राहील, असा चिमटा सातव यांनी काढला.