राहुल गांधीकडून विरोधी पक्षासाठी आज ‘ब्रेकफास्ट’, पेगासस व इतर मुद्यांवर आखणार रणनीती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 09:37 AM2021-08-03T09:37:01+5:302021-08-03T09:37:37+5:30
Rahul Gandhi News: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना मंगळवारी सकाळी ‘ब्रेकफास्ट’साठी आमंत्रित केले आहे. यानिमित्ताने पेगासस फोन टॅपिंगसह इतर प्रश्नांवर विरोधी पक्षांमधील विविध नेत्यांसोबत राहुल गांधी चर्चा करणार आहेत.
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना मंगळवारी सकाळी ‘ब्रेकफास्ट’साठी आमंत्रित केले आहे. यानिमित्ताने पेगासस फोन टॅपिंगसह इतर प्रश्नांवर विरोधी पक्षांमधील विविध नेत्यांसोबत राहुल गांधी चर्चा करणार आहेत.
संसद भवनाजवळील कॉन्स्टीट्युशन क्लब येथे सकाळी ९.३० वाजता विरोधी पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित केले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डीएमके, आरजेडी तसेच डाव्या पक्षांच्या सदस्यांसोबत राहुल गांधी विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. केंद्र सरकारला कोंडीत पकडण्यासाठी रणनिती आखण्यासाठी यावेळी प्रामुख्यान चर्चा होणार आहे. पेगॅसस फोन टॅपिंगप्रकरणी सविस्तर चर्चेची मागणी विरोधकांकडून सातत्याने होत आहे. त्यावरुन गेले दोन आठवड्यांपासून संसदेचे कामकाज होउ शकले नाही. केंद्र सरकारने विरोधकांची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे पुढील रणनिती काय असावी, याबाबत प्रामुख्याने चर्चा होणार आहे.
याशिवाय विरोधी पक्षांकडून वेगवेगळ्या ठिकाणी संसदेबाहेर समांतर अधिवेशन घेण्याची योजना असल्याचे सुत्रांनी सांगितले. पेगॅसस प्रकरण, शेतकरी आंदोलन आणि केंद्र सरकारकडून कोरोना महामारीच्या हताळणीचे मुद्दे समांतर अधिवेशनाद्वारे जनतेसमोर मांडण्याची विरोधकांची योजना आहे.