रावण, माकड, कुत्रा, उंदीर... हेच का तुमचं 'प्रेम'? काँग्रेस नेत्यांनी वापरलेल्या शब्दांची यादी देत मोदींचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 08:21 AM2019-05-09T08:21:29+5:302019-05-09T08:24:18+5:30
प्रेमानं हरवू म्हणणाऱ्या राहुल गांधींवर मोदींचा निशाणा
नवी दिल्ली: पंतप्रधान मोदी माझा द्वेष करतात. मात्र माझ्याकडून त्यांना प्रेमच मिळेल, असं वारंवार म्हणणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर मोदींनी जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस नेत्यांनी पातळी सोडून वापरलेल्या शब्दांची यादी देत हेच का तुमचं प्रेम, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते हरयाणाच्या कुरुक्षेत्रमध्ये एका जनसभेला संबोधित करत होते.
'काँग्रेसचा एक नेता मला घाणेरड्या नाल्यातला किडा म्हणला होता. तर एकानं मला पिसाळलेला कुत्रा म्हटलं होतं. एकजण मला भस्मासूर म्हणाला होता. तर माजी परराष्ट्र मंत्री असलेला काँग्रेस नेता मला माकड म्हणाला होता. एकानं माझी तुलना दाऊद इब्राहिमशी केली होती. याशिवाय मला व्हायरस, हिटलर, बेजबाबदार आणि असभ्य मुलगा, रेबीज झालेला कुत्रा, उंदीरदेखील म्हटलं गेलं. रावण, साप, विंचू, विष ओकणारा माणूस, असे शब्ददेखील माझ्यासाठी वापरण्यात आले,' असं म्हणत मोदींनी काँग्रेसनं पातळी सोडून केलेल्या टीकेची आठवण उपस्थितांना करुन दिली.
यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर उपरोधिक टीका केली. काँग्रेस नेत्यांनी मर्यादा ओलांडून केलेल्या टीकेचा संदर्भ देत हाच काँग्रेसच्या प्रेमाचा शब्दकोष आहे का, असा सवाल मोदींनी विचारला. काँग्रेस असे शब्द वापरुन माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करते का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसच्या घराणेशाहीला आव्हान दिल्यानंच माझ्यावर अशा प्रकारची टीका होत असल्याचा दावा मोदींनी केला. 'मी त्यांचा भ्रष्टाचार थांबवला आणि त्यांच्या घराणेशाहीला आव्हान दिलं. त्यामुळेच आता ते प्रेमाचे मुखवटे घालून मला शिव्या देतात,' असं पंतप्रधान म्हणाले.