राष्ट्रवादीच्या रणनीतीचा भाजपाला फटका? शरद पवारांनी अजितदादांवर सोपवली नवी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 04:26 PM2020-08-13T16:26:49+5:302020-08-13T16:29:58+5:30
महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षाचं राजकारण आणि ताकद ओळखून त्या त्या जिल्ह्यात नेत्यांना पुन्हा पक्षात घेण्याचा विचार सुरु आहे.
मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांची कानउघडणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज झाल्याची चर्चा होती. मात्र त्यानंतर शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला अजितदादाही उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादीच्या पुढील रणनीतीबद्दल चर्चा झाल्याची माहिती आहे.
यामध्ये सर्वात मुख्य म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी जे लोक राष्ट्रवादीसोडून भाजपात गेले होते अशा नेत्यांना पुन्हा पक्षात घेण्याबाबत व्यूहरचना आखण्यात आल्याची माहिती आहे. याबैठकीला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षाचं राजकारण आणि ताकद ओळखून त्या त्या जिल्ह्यात नेत्यांना पुन्हा पक्षात घेण्याचा विचार सुरु आहे.
पक्ष सोडून गेलेल्या कोणत्या नेत्यांना राष्ट्रवादीत परत घ्यायचं याची जबाबदारी जयंत पाटील आणि अजित पवारांवर दिली आहे. अलीकडेच राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी भाजपात गेलेले नेते पक्षात येण्यास उत्सुक आहेत, पण अद्याप त्यावर निर्णय झाला नाही. लवकरच कळवलं जाईल असं म्हटलं होतं. त्यामुळे बुधवारच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. याबाबत न्यूज १८ ने बातमी दिली आहे.
राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे भाजपातील कोणते नेत्यांचा अथवा आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश करुन घ्यायचा याबाबत हालचाली सुरु आहेत, तसेच प्रवेश देण्यापूर्वी मित्रपक्ष शिवसेना-काँग्रेसला विश्वासात घेतलं जाईल असंही सांगण्यात आलं आहे. तर याबाबत छगन भुजबळ यांनी सांगितले आहे की, भाजपाचे काही आमदार आमच्या संपर्कात असतील तर त्यांची नावे जाहीर करणार नाही, ते आमदार राजीनामा देऊन आले तर त्यांना महाविकास आघाडी पुन्हा निवडून आणू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पार्थ पवारांवरुन अजितदादा नाराज?
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या सीबीआय चौकशीची मागणी आणि राम मंदिराच्या निर्माणावेळी शुभेच्छा दिल्यानंतर पार्थ पवार यांच्यावर शरद पवारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. मी माझ्या नातवाच्या मागणीला कवडीचीही किंमत देत नाही, तो इमॅच्युर आहे अशा शब्दात पवारांनी पार्थला फटकारलं होतं. त्यानंतर पार्थ पवारांनी याविषयी काही बोलण्यास नकार दिला मात्र या प्रकरणावरुन राजकीय वर्तुळात अजित पवार हे नाराज झाल्याची चर्चा उठली होती.