उद्धव ठाकरेंच्या कारभारावर शरद पवारांची गुगली; महाविकास आघाडीत नेते नाराज असल्याची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 02:46 PM2020-07-28T14:46:57+5:302020-07-28T15:37:39+5:30
आता शरद पवारांनी महाविकास आघाडीचं रिमोट माझ्या हातात नाही, पण काही नेते अस्वस्थ आहेत असं सांगत राजकीय वातावरण पेटवलं आहे.
मुंबई – शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास राज्याच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार आहे, पण निवडणुका वेगळ्या लढू अशी भूमिका भाजपाकडून जाहीर करण्यात आली, मात्र या विधानानंतर आता राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापणार असल्याचं चिन्हं दिसत आहेत. सरकार महाविकास आघाडीचं असलं तरी स्टेअरिंग माझ्या हातात आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजितदादांनी स्टेअरिंग पकडलेला फोटो पोस्ट करत उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
यानंतर आता शरद पवारांनी महाविकास आघाडीचं रिमोट माझ्या हातात नाही, पण काही नेते अस्वस्थ आहेत असं सांगत राजकीय वातावरण पेटवलं आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री उद्धव ठाकरेंच्या कारभारावर नाराज आहेत अशी चर्चा होती. त्यावर शरद पवारांनी भाष्य केले आहे, ते म्हणाले की, तिन्ही पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. देवेंद्र फडणवीसांच्या एकांगी कारभारामुळे या परिस्थितीत सर्व चाचपडून पाहिल्यानंतर शिवसेनेकडे नेतृत्व द्यावं यावर एकमत झालं असे त्यांनी सांगितले.
तसेच काही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे, महाविकास आघाडीचं सरकार आलं तरी कुठल्याही आघाडीच्या सरकारमध्ये नाराजी आणि अस्वस्थता असते. राज्य चालवताना काही इच्छा असतात त्या पूर्ण झाल्या नाहीत तर अस्वस्थता वाढते. सध्या नवीन पर्याय नसल्यानं हे सरकार ५ वर्षे चालेल, सध्याची परिस्थिती पाहता कोणालाही निवडणूक नको आहे असंही शरद पवार यांनी सांगत काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते नाराज असल्याची कबुलीच दिली आहे.
त्यासोबत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत, एका ठिकाणी बसून राज्याचा कारभार पाहत आहेत पण थोडं फिरलंही पाहिजे असं विधान शरद पवारांनी केलं आहे, त्यामुळे मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत या विरोधकांच्या आरोपावर शरद पवारांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच राष्ट्रवादीत अनिल देशमुख, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे यांना फिल्डवरची जबाबदारी दिली आहे. तर अजितदादांची फिल्डपेक्षा मंत्रालयात अधिक गरज आहे कारण त्यांच्याकडे अर्थ नियोजनाची जबाबदारी आहे. जयंत पाटील आणि अजित पवार पक्षाचं कामही पाहत आहेत असं शरद पवारांनी सांगितले. सीएनएन न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
दरम्यान, भाजपाला लोकशाही पचत नाही, दुसऱ्या विचारांचे सरकार नको अशी त्यांची भूमिका आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वांना सोबत घेऊन जायचं असते पण त्यांना असं करु देत नाहीत असं सांगत पवारांनी अप्रत्यक्षपणे भाजपाच्या इतर नेत्यांना टोला लगावला. तर राम मंदिराच्या भूमीपूजनाचं निमंत्रण मिळालं तरी जाणार नाही, कारण सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचं गांभीर्य आहे, राज्याच्या हिताची जबाबदारी मोठी आहे असंही शरद पवारांनी स्पष्ट केले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
राज्याच्या हितासाठी एकत्र यायला तयार, पण निवडणुका वेगळ्या लढू; शिवसेनेबाबत भाजपाचं मोठं विधान
शिक्षण पूर्ण करण्यासाठी 'त्याने' पहाटे ४ वाजता उठून कार धुण्याचं काम केलं, बारावीत मिळाले ९१ % गुण
सोन्याच्या दराने बनवला नवा रेकॉर्ड तर चांदीही करणार मालामाल; जाणून घ्या आजचे दर
केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट; राज्याला दिला १९ हजार २३३ कोटी जीएसटी परतावा