राहुल गांधींच्या ब्रेकफास्ट मिटिंगमध्ये शिवसेनेला मानाचं स्थान, संजय राऊतांशी साधला विशेष संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 02:11 PM2021-08-03T14:11:06+5:302021-08-03T14:15:00+5:30
Sanjay Raut & Rahul Gandhi News: २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे आव्हान मोडीत काढण्यासाठी विरोधकांनी आतापासून मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.
नवी दिल्ली - २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे आव्हान मोडीत काढण्यासाठी विरोधकांनी आतापासून मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच प्रत्यय सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात येत आहे. या अधिवेशनादरम्यान, पेगासस फोन टॅपिंगसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी संसदेचं कामकाज रोखून धरले आहे. त्याच पार्श्वभूमीवर या मुद्द्यांवर चर्चा कऱण्यासाठी राहुल गांधी यांनी आज विरोधी पक्षांमधील विविध नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला देशभरातील विविध विरोधी पक्षातील नेत्यांसोबत शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत हेसुद्धा उपस्थित होते. (Opposition Party floor leaders from Lok Sabha & Rajya Sabha attend a breakfast meeting called by Congress leader Rahul Gandhi)
विशेष बाब म्हणजे शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून या बैठकीत सहभागी झालेल्या संजय राऊत यांना या बैठकीत पहिल्या पंक्तीत स्थान देण्यात आले होते. तसेच राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यात यावेळी काही काळ अनौपचारिक चर्चाही झाली. तसेच या संवादाचा फोटो काँग्रेसकडून सोशल मीडियावर विशेष करून शेअर करण्यात आल्याने शिवसेना आणि काँग्रेसमधील मैत्री आता अधिक दृढ झाल्याचे संकेत मिळत आहेत.
Delhi: Opposition Party floor leaders from Lok Sabha & Rajya Sabha attend a breakfast meeting called by Congress leader Rahul Gandhi.
— ANI (@ANI) August 3, 2021
Aam Aadmi Party (AAP) is skipping the meeting. pic.twitter.com/iPHOmI3GTQ
दरम्यान, पेगॅसस फोन टॅपिंगप्रकरणी सविस्तर चर्चेची मागणी विरोधकांकडून सातत्याने होत आहे. त्यावरुन गेले दोन आठवड्यांपासून संसदेचे कामकाज होउ शकले नाही. केंद्र सरकारने विरोधकांची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे पुढील रणनिती काय असावी, याबाबत प्रामुख्याने चर्चा झाली. याशिवाय विरोधी पक्षांकडून वेगवेगळ्या ठिकाणी संसदेबाहेर समांतर अधिवेशन घेण्याची योजना असल्याचे सुत्रांनी सांगितले. पेगॅसस प्रकरण, शेतकरी आंदोलन आणि केंद्र सरकारकडून कोरोना महामारीच्या हताळणीचे मुद्दे समांतर अधिवेशनाद्वारे जनतेसमोर मांडण्याची विरोधकांची योजना आहे.